सातव्या वेतन आयोगानुसार, यंदाच्या अर्थसंकल्पानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचे गिफ्ट मिळू शकते. केंद्र सरकार येणाऱ्या अर्थसंकल्पानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीधारकांच्या डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ करु शकते. सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे एक कोटी कर्मचाऱ्यांना लाभ मिळू शकतो.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सरकारच्या या घोषणेनंतर डीए १७ टक्क्यांवरुन २१ टक्क्यांवर पोहोचणार आहे. केंद्र सरकार या वर्षी मार्च महिन्यात याची घोषणा करु शकते. माध्यमातील वृत्तांनुसार, श्रेणी-१ च्या कर्मचाऱ्यांसाठी डीएमध्ये ४ टक्के वाढ झाल्यास पगारात कमीत कमी ७२० रुपयांपासून जास्तीत जास्त १०,००० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. तसेच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५,००० रुपयांपासून २१,००० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.
जानेवारी २०१९ मध्ये केंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डीए ३ टक्के वाढवला होता. यापूर्वी गुजरात सरकारने आपल्या राज्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए ५ टक्के वाढवला होता.
दरम्यान, १ फेब्रुवारी २०२० रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत वार्षिक अर्थसंकल्प मांडणार आहेत.