‘मिग-२१ एफएलएस’ (टाइप ७७).. गेली ५० वष्रे या लढाऊ विमानाने भारतीय हवाई दलाची सेवा केली. अनेक युद्धात या विमानाचा वापर करण्यात आला. मात्र आता भारतीय हवाई दलाचा तेजस्वी अध्याय लिहिणारे हे विमान इतिहासजमा होणार आहे. पश्चिम बंगालमधील कैलाईकुंडा येथील हवाई दलाच्या तळावरून बुधवारी या विमानाला निरोप देण्यात येईल.
कैलाईकुंडा हवाई तळावरून ‘मिग-२१’ या प्रकारातील चार विमाने आकाशभरारी घेतील आणि हवाई दलप्रमुख एन.ए.के. ब्राऊनी यांना सलामी देतील. त्यानंतर हवाई दलाची अध्रेशतक सेवा करणाऱ्या या लढाऊ विमानाचे युग समाप्त होईल. सध्या हवाई दलात ‘मिग-२७ एमआय’, ‘सुखोई-३० एमकेआय’ या प्रकारांतील अत्याधुनिक विमाने तैनात असल्याने ‘मिग-२१ एफएलएस’चे कार्य समाप्त झाले आहे. या विमानाने हवाई दलाची पाच दशके सेवा केल्याने त्याला अखेरची सलामी देण्यात येणार आहे, अशी भावना हवाई दलाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
हवाई दलात १९६५मध्ये तैनात झालेल्या ‘मिग-२१ एफएलएस’ने १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. ढाक्याभोवती बॉम्बहल्ला करण्यासाठी या विमानांचा महत्त्वपूर्ण उपयोग झाला होता. कारगील युद्धातही या विमानांनी मोठी कामगिरी बजावली होती. मात्र गेल्या काही वर्षांत या विमानांचे अनेकदा अपघात झाल्याने त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.