ओडिशातील बालासोर येथे तीन रेल्वेचा भीषण अपघात झाला होता. ही घटना ताजी असतानाच पश्चिम बंगालमध्ये आणखी एक रेल्वे अपघाताची घटना समोर आली आहे. रेल्वे रुळावर उभ्या असलेल्या मालगाडीला दुसऱ्या मालगाडीने धडक दिली आहे. ही धडक एवढी जोरदार होती की मालगाडीचे १२ डब्बे रुळावरून खाली घसरले आहेत. सुर्दैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
पश्चिम बंगालमधील बांकुडा येथे रविवारी सकाळी ४ वाजता ही घटना घडली. येथील ओंडा स्टेशनवर एक मालगाडी उभी होती. तेव्हा मागून येणाऱ्या दुसऱ्या मालगाडीने जोरात धडक दिली. या घटनेत मालगाडीचे १२ डब्बे रुळावरून खाली घसरले. यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. यात मालागाडीचे इंजिन रेल्वे रूळावरून खाली घसरलं आहे. एका मालगाडीचं प्रचंड नुकसानही झाल्याचं यामध्ये दिसत आहे. ही मालगाडी असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेत रेल्वे चालक जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे मालगाडीचे डब्बे रुळावरून हटवण्याचे काम सुरू झालं आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात ओडिशातील बालासोर येथे तीन रेल्वेचा विचित्र अपघात झाला होता. यात २८८ जणांचा मृत्यू, तर एक हजारच्यावर जण गंभीर जखमी झाले होते. अशातच मालगाडीचा हा अपघात घडल्याने रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.