इंटरनेटवरील बाललैंगिक अत्याचाराच्या व्हिडीओ आणि छायाचित्रांचा फैलाव रोखण्यासाठी गुगल आणि मायक्रोसॉफ्टने ठोस पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला असून इंग्रजीसह दीडशे भाषांतून अशा व्हिडीओ व छायाचित्रांसाठी दिले जाणारे ‘शोधसंदेश’ पुढील सहा महिन्यांत रोखले जाणार आहेत!
गुगलचे अध्यक्ष एरिक श्मिट यांनी ‘संडे मेल’मध्ये लिहिलेल्या लेखात ही घोषणा केली आहे. हे र्निबध इंग्रजीभाषक देशांसह तब्बल १५० भाषा नांदत असलेल्या देशांत लागू होणार आहेत. बाललैंगिकतेविषयी शोधसंदेश (सर्च) देण्यासाठी वापरता येऊ शकतील असे तब्बल एक लाख शब्द हुडकण्यात आले असून ते इंटरनेटवर शोधासाठी मारताच शोध रोखला जाणार आहे. त्यातूनही जर कुणी एखाद्या पोर्नोग्राफी साइटवरील बाललैंगिकतेविषयक चित्रफितींपर्यंत पोहोचलाच तर हा शोध बेकायदेशीर असल्याचा संदेश संगणकपटलावर झळकणार आहे.
गेले तीन महिने गुगलचा २०० तज्ज्ञांचा गट यासाठी अथक प्रयत्न करीत आहे. मायक्रोसॉफ्टनेही बाललैंगिकतेचा इंटरनेटवरील फैलाव रोखण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साह्य़ाने उपाय योजले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
इंटरनेटवरील बाललैंगिकतेचे प्रदर्शन पूर्णपणे रोखण्यासाठी दाखल झालेल्या जनहित याचिकेसंबंधात, सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार विभागाला त्यांची बाजू मांडण्याचा आदेश दिला आहे. अ‍ॅड. कमलेश वासवानी यांनी दाखल केलेल्या या याचिकेच्या मंगळवारच्या सुनावणीत सरकारने दूरसंचार मंत्रालयालाही सहभागी करून घेण्याची विनंती केली. याआधी केवळ माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला याचिकेवरून नोटीस पाठविण्यात आली होती.