केंद्रीय सूचना तथा प्रसारण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आज शिमल्यातील रोगजार मेळाव्यात सहभागी झाले होते. आतापर्यंत २ लाख ८८ हजार तरुणांना सरकारी नोकऱ्यांचं नियुक्तीपत्रे देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. भ्रष्टाचारसंदर्भातही त्यांनी भाष्य केलं. एवढंच नव्हे, तर भारताचं नाव उंचावेल असा सुंदर पिचई यांचा एक किस्साही त्यांनी उपस्थितांना सांगितला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू झाले. लोकांनी लसीकरणासाठी पुढे यावं याकरता केंद्र सरकारने पुढाकार घेतला होता. तसंच, कोविड लसीकरण नोंदणीसाठी लागणारी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने झाली. तसंच, सर्टिफिकेट्सही मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याचसंदर्भातील एक किस्सा अनुराग ठाकूर यांनी सांगितला.
“कोविन सर्टिफिकेट मोबाईलवर तुम्हाला मिळालं. सुंदर पिचई एका कार्यक्रमात मला भेटले होते. त्यांनी त्यांच्या खिशातून एक कागद काढला आणि म्हणाले ठाकूरजी माझं वॅक्सिनेशन सर्टिफेकट आजही माझ्यासोबत आहे. मला जगभर हार्डकॉपी घेऊन जावं लागतं. पण भारतात सर्वांकडे मोबाईलमध्ये वॅक्सिन सर्टिफिकेट आहे. तुम्हाला गर्व वाटला पाहिजे की जे कोणताही दुसरा देश करू शकला नाही ते आपण करून दाखवलंय.”
अनुराग ठाकूर पुढे म्हणाले की, “पंतप्रधान प्रत्येकाचे विचार ऐकत असतात. आप आणखी काय काय करू शकतो हे ऐकण्यासाठीही ते उत्सुक असतात. आतापर्यंत ९ कोटी ६० लाख लोकांपर्यंत सिलिंडर पोहोचवू शकलो. तसंच, साडेतीन कोटी लोकांना पक्की घरे दिली गेली. एवढंच नव्हे तर घराची नोंदणी महिलांच्या नावे ठेवण्याचाही नियम करण्यात आला.”