जगभरात ८० टक्क्यांहून जास्त नेटिझन्स ज्या सर्ज इंजिनचा वापर करतात, त्या गुगलचे सीईओ म्हणजे सुंदर पिचई! गुगलचा एकूणच पसारा बघता सुंदर पिचई त्यांच्या रोजच्या जीवनात किती बिझी असतील, याचा आपण फक्त अंदाजच लावू शकतो. पण त्यातूनही सुंदर पिचई जेव्हा एखाद्या तिऱ्हाईत व्यक्तीला सरप्राईज देतात, तेव्हा त्या व्यक्तीसाठी ती एखाद्या अकल्पित स्वप्नासारखीच गोष्ट ठरते! अमेरिकेच्या केंटुकी भागातल्या लेक्झिंग्टनमधल्या मायलो गोल्डिंग याच्यासाठी हे असंच एक अकल्पित आणि स्वप्नवत सरप्राईज ठरलं, जेव्हा खुद्द सुंदर पिचई यांनीच थेट मायलोला व्हिडीओ कॉल केला होता! तोही एक गुड न्यूज देण्यासाठी!
गुगलतर्फे दरवर्षी Doodle for Google स्पर्धा घेतली जाते. यामधील विजेत्याचे डूडल गुगलतर्फे त्यांच्या होमपेजवर दिले जाते. दरवर्षी या स्पर्धेसाठी वेगवेगळ्या संकल्पना (थीम) ठेवल्या जातात. या वर्षी स्पर्धेसाठी ‘I am strong because…’ अर्थात ‘मी सक्षम आहे कारण…’ अशी थीम ठेवण्यात आली होती. या वर्षी केंटकीच्या मायलो गोल्डिंगनं तयार केलेल्या डूडलची निवड करण्यात आली. मात्र, हे मायलो गोल्डिंगला नेहमीच्या पद्धतीने कळवण्याऐवजी सुंदर पिचई यांनी वेगळाच मार्ग निवडला!
मायलो गोल्डिंगचा मिळालं अकल्पित सरप्राईज!
सुंदर पिचई यांनी स्वत: मायलो गोल्डिंगला ही गुड न्यूज देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मायलो गोल्डिंगला व्हिडीओ कॉल करण्यात आला आणि त्यात खुद्द सुंदर पिचई यांनी त्याच्या डूडलची निवड केल्याचं सांगितलं. याविषयीही सुंदर पिचई यांनीच ट्वीट करून माहिती दिली आहे. “मायलो गोल्डिंगचं अभिनंदन. Finding Hope हे त्याचं डूडल गुगलच्या या वर्षीच्या थीमवरून तयार झालं आहे. ते आम्ही आमच्या होमपेजवर प्रदर्शित करणार आहोत. मायलोला ही बातमी देणं ही माझ्या या आठवड्यातली सगळ्यात स्पेशल बाब होती”, असं ट्वीट सुंदर पिचई यांनी केलं आहे.
Big congrats to Milo Golding, our 2021 Doodle for Google winner! His artwork titled “Finding Hope” was inspired by this year’s theme “I am strong because…” and will be on our US homepage tomorrow. Sharing the news with Milo was the highlight of my week:) https://t.co/zzhnkzdEBD pic.twitter.com/kmOntanXRV
— Sundar Pichai (@sundarpichai) June 14, 2021
काय आहे या डूडलमध्ये?
मायलो गोल्डिंगच्या या डूडलचं नाव Finding Hope असं आहे. यामध्ये एक मुलगा एका लहान मुलाला फुगा देऊ करत आहे. यासोबत इतरही काही अशाच आनंदी क्षणांचं चित्रण रंगीत पद्धतीने गुगल या अक्षरांमध्ये करण्यात आलं आहे. या डूडलविषयी मायलो सांगतो “आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले, ते कितीही अनिश्चित असलं, तरी यासोबतच आयुष्यात आशा ही असतेच”!
या डूडलसाठी गुगलकडून मायलोला ३० हजार डॉलरची कॉलेज स्कॉलरशिप, त्याच्या शाळेला किंवा त्याच्या निवडीच्या स्वयंसेवी संस्थेला ५० हजार डॉलरची देणगी आणि गुगल हार्डवेअर आणि गेमिंगचं पॅकेज असं बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे.