Work Hours For Google Employee : कंपनीच्या वृद्धीसाठी आणि स्पर्धेच्या युगात टीकून राहण्याकरता गेल्यावर्षी इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्याला ७० तास काम करण्याच्या सूचना केल्या होत्या. तसंच, एल अँड टीचे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यम यांनीही कर्मचाऱ्यांना आठवड्याला ९० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. गेल्या काही वर्षांपासून सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढल्याने केवळ ठराविक काम केल्याने स्पर्धेत टिकता येणार नाही, हे कंपन्यांच्या मालकांना अन् वरिष्ठांना कळून चुकलं आहे. आता खुद्द गुगलनेच चॅटजीपीटी आणि मायक्रोसॉफ्टचा धसका घेतला आहे. त्यामुळे गुगलचे सह-संस्थापक सर्गेई ब्रिन यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्याला ६० तास काम करण्याची विनंती केली आहे. याकरता त्यांनी कर्मचाऱ्यांना मेमोच पाठवला आहे. द न्यू यॉर्क टाईम्सच्या हवाल्याने एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मेमोमध्ये काय लिहिलंय?

सर्गेई ब्रिन यांनी आठवड्याच्या प्रत्येक दिवशी ऑफिसला येऊन काम करण्याचा सल्ला दिला आहे. १४४ अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले ब्रिन यांनी गुगलच्या एआय मॉडेल्स आणि अॅप्लिकेशन्सच्या लाइनअप जेमिनीला उद्देशून लिहिलेल्या मेमोमध्ये आठवड्याला ६० तास काम करून उत्पादकता वाढवण्यावर भर दिला आहे.

स्पर्धा वाढल्याने ६० तास काम करा

“स्पर्धा लक्षणीयरीत्या तीव्र झाली आहे आणि AGI ची अंतिम शर्यत सुरू आहे”, असे त्यांनी सांगितले. गुगल कर्मचाऱ्यांना ओपनएआय आणि मायक्रोसॉफ्टसारख्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पुढे राहण्यासाठी त्यांचे प्रयत्न वाढवावेत असे आवाहन त्यांनी केले. “मला वाटते की ही शर्यत जिंकण्यासाठी आपल्याकडे सर्व घटक आहेत, परंतु आपल्याला आपल्या प्रयत्नांना अधिक गती देण्याची गरज आहे”, असं त्यांनी मेमोमध्ये लिहिलं आहे. यावेळी त्यांनी ६० तासांच्या कामाच्या आठवड्यावरील आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

ब्रिन यांनी अभियंत्यांना कोड लिहिण्यात मदत करण्यासाठी गुगलच्या एआय मॉडेल्सचा वापर करण्यास प्रोत्साहित केले. यामुळे ते “जगातील सर्वात कार्यक्षम कोडर आणि एआय शास्त्रज्ञ” बनतील, असं म्हणत त्यांनी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले आहे. जेव्हा दोन वर्षांपूर्वी ChatGPT लाँच करण्यात आले, तेव्हा त्याच्या पहिल्या १०० दशलक्ष वापरकर्त्यांनी सक्रियपणे त्याचा शोध घेतला, त्यांना ते एकतर उल्लेखनीयपणे उपयुक्त वाटले किंवा निराशाजनक वाटले.

Story img Loader