मानव उत्क्रांतीच्या टप्प्यांचा पुरावा ठरलेल्या ‘लूसी’ सापळ्याच्या शोधाला ४१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने इंटरनेट महाजालातील लोकप्रीय सर्च इंजिन असलेल्या गुगलने खास ‘डुडल’ तयार केले आहे. या ‘डुडल’ची आकर्षक पद्धतीने मांडणी करण्यात आली असून गुगलच्या इंग्रजी अद्याक्षरातील ‘ओ’मध्ये मानव उत्क्रांतीचे तीन टप्पे दाखवण्यात आले आहेत.
‘लूसी’चा सापळा अंदाजे ३.२ दशलक्ष वर्षांपूर्वीचा असल्याचे हाडांच्या परिक्षणातून निष्पन्न झाले. हा सापळा ४० टक्क्यांपर्यंत अखंड स्वरुपात मिळविण्यात यश आले होते आणि संशोधक डोनाल्ड जॉन्सन यांनी सापळ्याला ‘लूसी इन द स्काय विथ डायमंड’ या गाण्याचा आधार घेत ‘लूसी’ हे नाव ठेवले होते. ‘लूसी’ सापळ्याच्या परिक्षणात मुख्यत्वे गुडघा आणि मणक्याच्या वक्रतेवरील अभ्यासाअंती संशोधकांना ‘लूसी’ आयुष्यातील बहुतेक काळ आपल्या दोन पायांवर चालल्याचे आढळून आले. मानव जातीशी तिचे साम्य असल्याचा दावाही संशोधकांनी केला. तसेच तिची उंची ३.७ फूट तर, वजन २९ किलो असल्याचेही मत संशोधकांनी मांडले होते.