सर्च इंजिन गुगलने आज प्रसिद्ध व्यंगचित्रकार मारियो मिरांडा  यांच्या जयंतीनिमत्त विशेष डुडल Google Doodle बनविले आहे. टाइम्स ऑफ इंडिया आणि इलस्ट्रेटेड वीकलीमधील व्यंगचित्रांसाठी मिरांडा हे प्रसिद्ध होते.
पद्मश्री (१९८८) आणि पद्मभूषण (२००२) या किताबांचे मानकरी ठरलेल्या मारिओ यांनी व्यंग्य शैलीत लोकजीवनाची चित्रे केली, त्यांची प्रदर्शने २२ देशांत भरली. अमेरिकेच्या सरकारी निमंत्रणावरून १९७४ मध्ये केलेला त्या देशाचा दौरा आणि तिथे ‘पीनट्स’ या कॉमिकचे निर्माते चार्ल्स शूल्ट्झ यांच्यासह काम करण्याची मिळालेली संधी ही आयुष्यातली मोठी उपलब्धी होती, असे मारिओ सांगत. मुंबईला कर्मभूमी मानणारे मारिओ निवृत्तीनंतर गोव्यातच राहिले. मुंबईतले सहकारी गेऱ्हार्ड डकुन्हा, दिवंगत कादंबरीकार मनोहर माळगावकर अशा मोजक्या मित्रांनी मारिओ यांच्याविषयी वेळोवेळी लिखाण केले आहे.
मिरांडा यांना कोंकणी आणि पोर्तुगीज या दोनच भाषा येत होत्या. परंतु पुढे बंगळूरूला शिक्षणासाठी गेल्यावर त्यांचा संबंध इंग्रजी भाषेशी आला. शाळेत असताना त्यांना घरातील भिंतीवर रेषाचित्रे काढायची सवय होती. त्यांच्या सततच्या भिंतीवरील चित्रे काढायच्या सवयीमुळे त्यांच्या आईने त्यांना चित्र काढण्याची वही आणून दिली. त्या वहीला मिरांडा डायरी म्हणत असत. मिरांडा यांना पहिल्यांदा व्यंगचित्रकार म्हणून ब्रेक दिला तो ‘करंट’ साप्ताहिकाने. त्यानंतर वर्षभरात टाईम, टाईम्स ऑफ इंडिया, फेमिना आणि इकॉनॉमिक टाईम्स या दैनिकात त्यांची व्यंगचित्रे प्रकाशित होत होती. मिरांडा यांचे काम पाहून त्यांचा स्पेन, लंडन, पोर्तुगाल आदी देशांनी सन्मान केला.
मारिओ यांनी ११ डिसेंबर २०११ साली या जगाचा निरोप घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा