लैंगिक गैरवर्तणुकीची गंभीर दखल घेतल गुगलने गेल्या दोन वर्षात एकूण 48 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं असल्याची माहिती गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांनी दिली आहे. सुंदर पिचाई यांनी गुगलच्या कर्मचाऱ्यांना एक ई-मेल पाठवला आहे. या मेलमध्ये न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीचा उल्लेख करण्यात आला असून त्याचं उत्तर देताना ही माहिती दिली आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्या या बातमीत गुगलने लैंगिक गैतवर्तणुकीचा आरोप असलेल्या आपल्या तीन वरिष्ठ कर्मचाऱ्यांना मोठी रक्कम देत वाचवलं असल्याचा दावा करण्याता आला होता. सुंदर पिचाई यांनी आपल्या मेलमध्ये ज्या 48 कर्मचाऱ्यांवर लैंगिक गैरवर्तणूक प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे त्यामधील 13 सीनिअर मॅनेजर किंवा सीनिअर पोस्टवरील कर्मचारी होते अशी माहिती दिली आहे.
यापैकी कोणत्याही कर्मचाऱ्याला एक्झिट पॅकेज देण्यात आलं नसल्याचंही सुंदर पिचाई यांनी सांगितलं आहे. या मेलमध्ये गुगलचे पिपल्स ऑपरेशन उपाध्यक्ष एलीन नॉटन यांचीदेखील स्वाक्षरी आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांना गैरवर्तवणुकीची तक्रार करायची असल्यास इंटरनल टूल वापरण्याचं आवाहन केलं आहे.
गुगलने आपली पॉलिसी अपडेट केली असून सर्व उपाध्यक्ष आणि वरिष्ठ उपाध्यक्षकांना एखाद्या सह-कर्मचाऱ्यासोबत संबंध असल्यास तसं जाहीर करण्यास सांगितलं आहे. ‘गुगल कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण देण्यास बांधील आहे जेणेकरुन तुम्हाला कोणतीही भीती वाटता कामा नये. जर कोणी गैरवर्तवणूक केली तर त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील’, असं मेलमध्ये सांगण्यात आलं आहे.