२७ सप्टेंबर म्हणजे आपल्या लाडक्या ‘गुगल’चा वाढदिवस. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असणारा आपल्या सर्वांचा मित्र म्हणजे गुगल. गुगलला आज २० वर्षे पूर्ण झाले असून गुगल आपला वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने गूगलने एक खास डूडल तयार केलं आहे आणि या माध्यमातून त्याने स्वतःला शुभेच्छादेखील दिल्या आहेत. पण प्रत्येक प्रश्नाला उत्तर असलेल्या गुगलची स्वतःची ओळख ही एका चुकीच्या स्पेलिंगमुळे झाली आहे, हे फार कमी लोकांना माहिती असेल.
१९९८ साली गूगलने आपला पहिला वाढदिवस साजरा केला होता. पण तारखेवरुन एक वाद कायम होता. अखेर त्यानंतर १७व्या वाढदिवसापासून २७ सप्टेंबरलाच गूगल अधिकृतपणे आपला वाढदिवस साजरा करु लागला. ४ सप्टेंबर १९९८ रोजी गूगल पहिल्यांदा जगासमोर आले. लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांच्या हस्ते गूगलची स्थापना झाली आणि आज तर इंटरनेट सर्च इंजिनचं जायंट म्हणून गूगलकडे पाहिले जाते. पण गूगलची ओळख एका स्पेलिंग मिस्टेकमुळे आहे.
ही आहे गोष्ट
खरं पाहता आताच्या ‘Google’चे नाव हे ‘Googol’ ठेवायचं होतं. पण स्पेलिंगच्या चुकीमुळे ते ‘Google’ असं झालं आणि त्यानंतर याच नावाने ते पुढे प्रसिद्ध झालं. अत्यंत कमी कालावधीत ‘Google’ प्रसिद्ध झाल्यामुळे नंतर हे असेच ठेवण्यात आले आणि आज इंटरनेट सर्च इंजिनच्या दुनियेत ‘जायंट’ म्हणून गूगलकडे पाहिलं जातं. त्या आधीही पेज आणि ब्रेन यांनी गूगलचं नाव ‘बॅकरब’ असं ठेवलं होतं. मात्र, त्यानंतर हे नाव बदलून गूगल असं नाव करण्यात आलं. १९९७ साली कंपनीने डोमेन रजिस्टर केले आणि अधिकृतपणे ‘गूगल’ असे नाव ठेवण्यात आले.