Google Map Accident UP: उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात लग्नाला जात असलेल्या एका वाहनाचा रविवारी (दि. २४ नोव्हेंबर) अपघात घडला. गुगल मॅप्सवरून दाखविलेल्या रस्त्यावरून वाहन चालविताना मोठा अपघात घडला. याप्रकरणी आता सार्वजनिक बांधकाम विभागातील चार अधिकाऱ्यांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी गुगलच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनाही याप्रकरणी जबाबदार धरले आहे. त्यानंतर गुगलने या प्रकरणी उत्तर दिले आहे.

प्रकरण काय आहे?

गुरुग्रामहून उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात लग्नासाठी जात असातना बदायूँ जिल्ह्यातील दातागंज येथे अपघाताची घटना घडली. यावेळी गुगल मॅप्सने दाखविलेल्या रस्त्यावरून जात असताना त्यांनी रामगंगा नदीवरील ब्रिजवरचा रस्ता निवडला. पण हा ब्रिज अर्धवट असल्याची त्यांना कल्पना नव्हती. वाहन वेगात पुढे गेल्यानंतर ते थेट नदीत कोसळले आणि तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

हे वाचा >> VIDEO: “याला म्हणतात स्वत:हून मृत्यूच्या जाळ्यात अडकणे” अर्धवट बांधकाम झालेल्या पुलावर गाडी चढवली अन् पुढच्याच क्षणी मृत्यूचा थरार

यावर्षीच्या सुरुवातीला पुरामुळे नदीतील पुलाचा पुढचा भाग वाहून गेला होता. तेव्हापासून हा पुल अर्धवट अवस्थेत आहे. मात्र गुगल मॅप्सवर त्याबाबतची माहिती अद्यवत झाली नव्हती. आंधळेपणाने गुगल मॅप्सचे अनुकरण केल्यामुळे तीन तरुणांना नाहक जीव गमवावा लागला.

पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, पोलिसांनी या प्रकरणी आता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि गुगलमधील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. मात्र या अधिकाऱ्याचे नाव त्यांनी जाहीर केले नाही.

गुगलने काय उत्तर दिले?

दरम्यान गुगलच्या वतीने या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. गुगलच्या प्रवक्त्यांनी एएफपी वृत्तसंस्थेला पाठविलेल्या ईमेलमध्ये म्हटले की, ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्याप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो. आम्ही संबंधित यंत्रणेबरोबर समन्वयातून काम करत आहोत.

मृतांमध्ये ३० वर्षीय नितीन कुमार आणि त्याचे चुलत भाऊ अमित कुमार आणि अजीत कुमार यांचा समावेश आहे. हे तिघेही गुरुग्रामवरून निघाले होते, बरेली जिल्ह्यात लग्नासाठी जात असताना वाटेत बदायूँ जिल्ह्यातील रामगंगा नदीवर ही दुर्घटना घडली.