Google Maps misguides trailer : गुगल मॅप्सचा वापर अनेक जण करताना दिसतात. अनोळखी ठिकाणी याचा खूप फायदा देखील होतो. मात्र या गुगल मॅपच्या वापरामुळे एक १० चाकी ट्रेलर राजस्थानच्या एका बाजारात अडकून पडल्याची घटना समोर आली आहे. यामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात सात तास वाहतूक कोंडी झाली होती.
हे ट्रेलर रस्त्यावर अडकल्याने अनेक दुकानांचे नुकसान झाले, त्यामुळे अधिकाऱ्यांना क्रेनचा वापर करून हे वाहन बाहेर काढावे लागले.यावेळी परिसरात एकच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान ट्रेलर चालकाने मात्र घटना स्थळावरून पळ काढला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे ट्रेलर जयपूरवरून दौसा येथे जात होते. यावेळी चालकाने रस्ता माहिती नसल्याने गुगल मॅपचा वापर केला. मात्र चुकीचा रस्ता दाखवल्याने वाहन रस्ता सोडून गर्दी असलेल्या तुंगा परिसरातील बाजारात शिरला.
या बाजारातील रस्ते अरूंद असल्याने तसेच या भागात वर्दळ जास्त असल्याने ट्रेलरला वळणे शक्य झाले नाही आणि हे अवजड वाहन बाजारातील दुकानांमध्ये पार्क केलेल्या इतर वाहनांमध्ये अडकून पडले.
ट्रेलर बाहेर काढण्याच्या प्रयत्नात पुढे घेतले असता अनेक दुकानांच्या पुढच्या बाजुचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले, यावेळी रस्त्यावरील वाहनांचे देखील नुकसान झाले. या प्रकारामुळे संपूर्ण बाजारातील वाहतूक ठप्प झाली. यामुळे दुकानदार आणि रस्त्याने जाणाऱ्यांना मनस्थाप सहन करावा लागला. दुकानदारांनी देखील या प्रकारावर संताप व्यक्त केला.
बाजारात अडकलेल्या या ट्रेलरमुळे अर्धा डझनहून जास्त दुकानांचे नुकसान झाल्याने परिस्थिती चांगलीच चिघळली, यानंतर दुकानदारांनी प्रशासनाकडे याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी हे अडकून पडलेले वाहन बाजूला करण्यास सुरूवात केली.
क्रेनचा वापर करून पोलिसांनी हे ट्रेलर बाजूला केले, पण यासाठी तब्बल सात तासांचा वेळ लागला. पण अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आणि अखेर बाजारातील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.