इंटरनेट क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुगलचे भारतातील पहिले स्वत:चे केंद्र हैदराबाद येथे सुरू होत आहे. त्याबाबत तेलंगण सरकार व गुगल यांच्यात समझोता करार होणार आहे.
गुगलबरोबर सरकार करार करणार आहे. अमेरिका, इंग्लंड व नंतर आता भारतात त्यांचे तिसरे केंद्र सुरू होईल. गुगल सध्या येथे भाडय़ाच्या जागेत आहे. त्यांना कायमची जागा हवी असून त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने त्यांना जागा दिली जाईल, असे तेलंगणाचे माहिती तंत्रज्ञान व दळणवळण सचिव हरप्रित सिंग यांनी सांगितले.
गुगलला ७० हजार एकर जागा दिली जाणार असून या केंद्राचे उद्घाटन दोन जूनला तेलंगण निर्मिती दिनाच्या दिवशी केले जाईल असे त्यांनी सांगितले.
हैदराबाद लवकरच वायफाय
हैदराबादला वाय-फाय शहर करण्यासाठी सरकारच्या प्रस्तावाला सिस्को, व्होडाफोन व तैवानी कंपनीने प्रतिसाद दिला आहे. तैवानी कंपनीने तैपैई शहर वायफाय केलेले आहे. शहराचा नकाशा, रस्ते व इतर माहिती या कंपन्यांनी मागितली आहे ती आम्ही तयार करीत आहोत, असे ते म्हणाले. ‘वाय-फाय’पेक्षाही त्यासाठी लागणारा पैसा हा मोठा प्रश्न आहे असे सांगून ते म्हणाले की, येत्या तीन-चार महिन्यांत त्याचे कंत्राट दिले जाईल. सहा महिन्यांत संबंधित कंपनीला पायाभूत सुविधा उभ्या कराव्या लागतील. पुढील वर्षीपर्यंत हैदराबाद शहर वाय-फाय होईल.
आयटी नकाशावर हैदराबाद
*सॉफ्टवेअर निर्यात -५७ हजार कोटी (२०१३-१४)
*सॉफ्टवेअर निर्यात- १० अब्ज कोटी (२०१४-१५)
*सॉफ्टवेअर निर्यात वाढ- १२ %