गुगल सर्चमध्ये लोकांना जी उत्तरे मिळाली त्यामुळे अनिर्णीत असलेल्या मतदारांच्या उमेदवार पसंतीवर परिणाम झाला व त्यामुळे निकाल फिरण्यासही मदत झाली असावी, असा दावा भारतातील लोकसभा निवडणुकांच्या एका मोठय़ा विश्लेषण अभ्यासात करण्यात आला आहे.
अलीकडच्या काही आठवडय़ांत करण्यात आलेल्या अभ्यासानुसार गुगल सर्चने निवडणुकीत अनिर्णीत मतदारांना निर्णायक पातळीवर आणून मोठी भूमिका पार पाडली आहे. मतदारांनी केलेल्या शोधयंत्राच्या वापरावरून बरेच अंदाज मिळाले आहेत. सर्चच्या क्रमवारीचा परिणाम हा लोकांच्या मतांवर होत असतो. जेवढी क्रमवारी वरची तेवढा त्या उत्पादनावर लोकांचा विश्वास जास्त असा एक ठोकताळा मानला जातो. त्याच पद्धतीने लोकसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत कुणाला मत द्यायचे यावर निर्णय होत नसलेल्या लोकांना निर्णायक स्थितीत आणण्यासाठी त्यांनी केलेल्या गुगल शोधाची मदत झाली.अरविंद केजरीवाल यांच्या नावाचा शोध जास्त घेतला गेला, त्यामुळे त्यांना नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा जास्त मते पडतील असा अर्थ त्यावर संशोधकांनी लावला तर तो खरा समजायचा का, हा लाखमोलाचा प्रश्न आहे.
गेल्या वर्षी अमेरिकेत जो गुगल सर्च घेण्यात आला होता त्या वेळी मात्र अनिर्णीत मतदार हे गुगल सर्चमुळे फिरले व त्यामुळे त्यांचा कल हा १५ टक्क्यांनी विशिष्ट उमेदवारांकडे वळला. अलीकडे भारतात ज्या निवडणुका झाल्या, त्यात भारतात २०००पेक्षा अधिक अनिर्णीत मतदार होते.
संशोधकांच्या मते भारतातील मते एखाद्याच विशिष्ट उमेदवाराकडे वळवणे सोपे आहे. विशिष्ट लोकसमूहातील गटाचा कल अशाप्रकारे १२ टक्क्यांनी फिरला तरी तो त्या मतदारसंघातील लढत निकराची करण्यास मदत करणारा असतो, असा संशोधकांचा दावा आहे.
‘हा अतिशय गंभीर विषय असून त्यामुळे लोकशाहीला धोका आहे असे आपल्याला वाटते. जर दोन उमेदवार त्यांची क्रमवारीतील स्थान वाढवण्याचा प्रयत्न करीत असतील व स्पर्धा करीत असतील तर ते ठीक आहे, पण जर गुगल सर्चने भारतात एखाद्या उमेदवाराच्या बाजूने अनिर्णीत मते मिळवण्याची मक्तेदारी प्राप्त केली असेल तर शोध क्रमवारीत खोटारडेपणा किंवा कृत्रिमता आणून निकालही वळवला जाऊ शकतो व त्यासाठी गुगलच्या या अनिष्ट प्रवृत्तीला रोखणे गरजेचे आहे. अगदी मानवी हस्तक्षेपाशिवाय कंपनी सर्च अलगॉरिथमच्या माध्यमातून एखाद्या उमेदवाराच्या बाजूने हजारो मते फिरवणे शक्य असते’
प्रमुख संशोधक तसेच कॅलिफोर्नियातील वर्तन संशोधन व तंत्रज्ञान संस्थेचे मानसशास्त्रज्ञ- कॅरॉबर्ट एपस्टेन