Google Doodle on Teacher’s Day : शिक्षकांचे आपल्या आयुष्यात खास महत्त्व असते. आपल्या आयुष्याला आकार देण्याचे काम शिक्षक करतात. आई हा प्रत्येकाचाच पहिला गुरू असते. त्यानंतर शाळा आणि महाविद्यालयात आपल्याला शिकवणारे शिक्षक हे आपल्या आयुष्यातील वाटचालीतले सोबतीच असतात. अशाच शिक्षकांचा आदर राखत गुगलने एक खास डुडल तयार केले आहे. गुगलचे हे खास अॅनिमेटेड डुडल हे जगभरातल्या शिक्षकांसाठी अनोखे गिफ्टच ठरले आहे.

जगभरातले सुप्रसिद्ध सर्च इंजिन असलेल्या गुगलने अत्यंत खास पद्धतीने हे डुडल तयार केले आहे. GOOGLE या अक्षरांमध्ये G हा एक ग्लोब दाखवण्यात आला आहे. हा ग्लोब फिरतो आणि थांबतो. त्याला एक चष्माही लावण्यात आला आहे जो एखाद्या शिक्षकाप्रमाणेच भासतो. तसेच हा ग्लोब जेव्हा फिरून थांबतो तेव्हा त्यातून गणित, विज्ञान, अंतराळ, संगीत, खेळ या विषयांशी संबंधित चिन्हे बाहेर येतात. अत्यंत लोभस असे डुडल आपल्याला पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह होतो.

दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णण यांच्या सन्मानार्थ हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे दुसरे राष्ट्रपती होते. १९६२ मध्ये जेव्हा ते राष्ट्रपती झाले तेव्हा लोकांनी ५ सप्टेंबर हा दिवस राधाकृष्णन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. मात्र राधाकृष्णन यांनी या निर्णयाला विरोध केला आणि याऐवजी आपण देशातील सगळ्या शिक्षकांचा सन्मान म्हणून शिक्षक दिवस साजरा करू असा प्रस्ताव मांडला. तेव्हापासून शिक्षक दिन दरवर्षी ५ सप्टेंबरला साजरा केला जातो.

Story img Loader