स्वातंत्र्यदिनाच्या पाश्र्वभूमीवर ‘गुगल’ने एक वेगळे पाऊल उचलले आहे. भारतातील नागरिकांच्या आयुष्यात तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे सकारात्मक बदल कसे घडवून आणता येतील याबाबत उत्कृष्ट प्रस्ताव पाठविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना गुगलतर्फे पुरस्कार देण्यात येणार आहे.
‘गुगल इम्पॅक्ट चॅलेंज इन इंडिया’ अशी स्पर्धा गुगलने जाहीर केली आहे. तीन कोटी रुपयांचे उत्तेजनपर पारितोषिक असलेल्या या स्पर्धेचे नियम आणि रूप प्रचलित स्पर्धापेक्षा निराळेच आहे. स्पर्धेत सहभागी होण्याच्या अटींपासून ते जिंकणाऱ्या चार संस्थांना मिळणाऱ्या पारितोषिकापर्यंत सारे काही कल्पक आहे.
स्पर्धेचे स्वरूप
भारतीय नागरिकांच्या आयुष्यात तंत्रज्ञानाने आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी काय करता येऊ शकेल किंवा असा बदल घडविण्यासाठी तंत्रज्ञान कसे वापरावे याबाबत स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पाश्र्वभूमीवर ही ‘आव्हान स्पर्धा’ आयोजित करण्यात आली असून, ५ सप्टेंबपर्यंत स्वयंसेवी संस्थांनी आपले प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने पाठविणे अपेक्षित आहे.
स्पर्धेचे नियम आणि निकाल
भारतातून तसेच जगभरातील गुगलच्या वापरकर्त्यांकडून आलेला प्रस्ताव यांच्यामधून अंतिम फेरीसाठी १० अव्वल प्रस्ताव निवडण्यात येतील. या १० अव्वल प्रस्तावांचा तपशील २१ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येईल. या दहांपैकी आपल्याला कोणता प्रस्ताव आवडला ते कळविण्याची सुविधा गुगल वापरकर्त्यांना देण्यात येणार आहे. यातून ‘फॅन फेवरेट’ प्रस्ताव पुरस्कार देण्यात येणार आहे.
पंच आणि पारितोषिक
३१ ऑक्टोबर रोजी, सर्व पंचांतर्फे दहा प्रस्तावकर्त्यांशी संवाद साधला जाईल. त्यानंतर प्रस्तावाचा प्रभाव, त्याचा आवाका आणि त्याची व्याप्ती पाहून तीन प्रस्तावांना पारितोषिक जाहीर केले जाईल. स्पर्धेसाठी राम श्रीराम, जॅक्वेलीन फुलर, अनु अगा आणि जयवंत सिन्हा यांच्यासह गुगलचे उपाध्यक्ष निकेश अरोरा पंच म्हणून काम पाहतील.  स्पर्धेच्या तीनही विजेत्या प्रस्तावांना प्रत्येकी तीन कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्दिष्ट कोणते? : भारतात कल्पकता आणि सर्जनशीलता मोठय़ा प्रमाणावर आहे, मात्र तिला पुरेसा वाव मिळालेला नाही. वैविध्याने नटलेल्या या देशात तंत्रज्ञानाचा प्रसार तळागाळापर्यंत होणेही गरजेचे झाले आहे. स्वयंसेवी वृत्तीने जमेल तेवढय़ा शक्तिनिशी समाजातील प्रश्नांवर काम करणाऱ्या संस्थांची-कार्यकर्त्यांची या देशात वानवा नाही. या सर्वाची सांगड घालून देशातील नागरिकांसमोरचे प्रश्न, तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलेले पर्याय आणि स्वयंसेवी संस्थांच्या गरजा असे समीकरण सोडविणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google to celebrate indias independence day to award rs 3 crores to 4 winners