तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असलेल्या गुगल कंपनीने चालकरहित रोबो टॅक्सीज विकसित करण्याचे ठरवले आहे. गुगलच्या चालकरहित रोबो टॅक्सीचा उद्देश प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार ने-आण सेवा उपलब्ध करून देण्याचा आहे. या चालकरहित टॅक्सीमुळे अपघातांची संख्या कमी होईल व पर्यावरण दृष्टिकोनातूनही त्याचा फायदा होईल असे ‘द टाइम्स’ने म्हटले आहे. त्याचा आणखी एक फायदा असा होणार आहे, की लोक मोटार खरेदी करणार नाहीत. चालकरहित मोटार किंवा टॅक्सी तयार करण्यासाठी गुगलने अलीकडेच काही मोटार उत्पादकांशी चर्चा सुरू केली आहे. यात गुगल कंपनीने पहिल्यांदा चालकरहित मोटारीसाठी लागणारे सॉफ्टवेअर तयार केले आहे. हे सॉफ्टवेअर मोटार उत्पादक कंपन्यांना दिले जाणार होते व त्यांनी त्याला अनुकूल अशी मोटारींची निर्मिती करणे अपेक्षित होते. गुगल कंपनीने चालकरहित मोटारींचा प्रकल्प २०१० मध्ये हाती घेतला असून, चालकरहित गाडीसाठी लागणारे सॉफ्टवेअर टोयोटा प्रियस व लेक्सस आरएक्स या गाडय़ांमध्ये बसवण्यात आले आहे. त्यात कंपनीचे कॅमेरे, संवेदक, रडार यांचाही समावेश आहे. ब्रिटनमध्ये अशा चालकरहित गाडय़ांच्या चाचण्यांना हिरवा कंदील देण्यात आला आहे. असे असले तरी गुगलशी तंत्रज्ञान भागीदारी करण्याची अनेक मोटार कंपन्यांची तयारी नाही, कारण त्यामुळे मोटार उत्पादन क्षेत्रात गुगल कंपनीचा चंचुप्रवेश होईल अशी भीती त्यांना वाटते. त्यामुळे आता गुगल कंपनीने मोटारींचे उत्पादन स्वत: करण्याचे ठरवले आहे. गुगलने चालकरहित मोटारी तयार करताना कॉन्टिनेंटल या मोटारींचे सुटे भाग तयार करणाऱ्या कंपनीची मदत घेण्याचे ठरवले आहे, असे फ्रँकफर्टर अलगेमाइन झेटुंग या जर्मन वृत्तपत्राने म्हटले आहे.
गुगल एक्स अंतर्गत रोबो टॅक्सी म्हणजे चालकरहित मोटार तयार केली जाणार असून, यापूर्वी गुगलने ग्लास नावाचे उच्चतंत्राधिष्ठित चष्मे तयार केले आहेत, ते थेट डोळय़ांपर्यंत माहिती पोहोचवतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चालकरहित टॅक्सीचे फायदे
* अपघात टळतील
* पर्यावरणाचे रक्षण होईल
* प्रवाशांना सुरक्षित पर्याय मिळेल

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google to create driverless taxis to carry passengers