बलून इंटरनेट सेवेची प्राथमिक चाचणी यशस्वी
गुगल ही इंटरनेट सेवा क्षेत्रातील बडी कंपनी वातावरणातील स्ट्रॅटोस्फिअर या थरात इंटरनेट बीमिंग अँटेना सोडणार आहे. हे अँटेना जेलिफिश आकाराच्या बलूनवर बसवून मग सोडले जाणार आहेत त्यामुळे संपूर्ण पृथ्वीग्रहच ऑनलाइन होऊन जाईल. या प्रकल्पात इंटरनेट बीमिंग बलून्स सोडण्यास प्रारंभही झाला आहे.
इंटरनेट बीमिंग बलून सोडण्याचा हा प्रकल्प अठरा महिन्यांचा असून या गुप्त प्रकल्पाची घोषणा आज न्यूझीलंड येथे करण्यात आली. तेथे किमान पन्नास स्वयंसेवी कुटुंबांना त्यांच्या घरातील संगणकावर इंटरनेट सेवा मिळण्यास प्रारंभ झाला आहे. पृथ्वीच्या वातावरणात १२ मैल उंचावर तरंगणाऱ्या हेलियम बलूनच्या मदतीने ही इंटरनेट सेवा त्यांना मिळाली आहे.
हा प्रकल्प सध्या चाचणी अवस्थेत असला तरी गुगल कंपनी पॉलिथिन फिल्मचे बनवलेले हजारो बलून वातावरणात सोडणार आहे, त्यामुळे अतिशय दूरस्थ अशा ठिकाणीही इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे. सध्या पृथ्वीवर २.२ अब्ज लोकांना इंटरनेट सेवा उपलब्ध आहे व ४.८ अब्ज लोकांना ती उपलब्ध नाही ही दरी भरून काढणे त्यामुळे शक्य होणार आहे.
हा प्रकल्प यशस्वी झाला तर अनेक देशांचा फायबर ऑप्टिक्स केबल बसवण्याचा खर्चही वाचणार आहे. विशेष म्हणजे आफ्रिका व आग्नेय आशियात त्यामुळे इंटरनेटचा वापर वाढणार आहे. प्रकल्पाचे प्रमुख माइक कॅसिडी यांनी सांगितले की, अतिशय मोठे उद्दिष्ट यात ठेवले आहे. आजच्या काळात इंटरनेटची ताकद ही स्थित्यंतर घडवणारे तंत्रज्ञान म्हणून मोठीच आहे.
गुगलच्या गुप्त ठिकाणी असलेल्या गुगल एक्स प्रयोगशाळेत या प्रकल्प लूनची आखणी करण्यात आली, त्यात चालकविहिन मोटार तसेच वेब सर्फिग आयग्लासेस यांचीही निर्मिती करण्यात आली होती.
बलूनच्या मदतीने इंटरनेट सेवा मिळणारी व्यक्ती लीस्टन या छोटय़ा शहरातील शेतकरी व उद्योजक असून चार्लस निमो असे त्याचे नाव आहे. तंत्रज्ञांनी बास्केटबॉलच्या आकाराचा लाल रंगाचा रिसिव्हर त्याच्या निवासस्थानाबाहेर लावला आहे.
पहिल्या यशस्वी चाचणीत निम्मो याला या बलूनच्या मदतीने पंधरा मिनिटे इंटरनेट सेवा मिळाली होती. त्याने इंटरनेटच्या मदतीने पहिल्यांदा हवामानाची माहिती घेतली. निम्मो हा अशा अनेक ग्रामीण लोकांपैकी एक होता ज्यांना इंटरनेट सेवा उपलब्ध नाही त्यांच्यापैकी एक आहे. उपग्रह इंटरनेट सेवेच्या माध्यमातून त्याने इंटरनेट सेवा चार वर्षांपूर्वी मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्याचे बिल महिन्याला १००० डॉलरपेक्षा अधिक येत होते.
गुगल बलून इंटरनेटच्या प्रयोगाविषयी निम्मो याने सांगितले की, हा प्रयोग विलक्षण आहे. काहीतरी नवीन घडत असताना त्याचा आपणही एक भाग आहोत ही आनंद देणारी बाब आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा