बांगलादेशच्या कमिला जिल्ह्यात एका दुर्गा पूजा मंडपात तोडफोडीची घटना घडली आहे. यानंतर परिसरात तणावाचं वातावरण पसरलं आहे. हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सोशल मीडियावर धार्मिक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तणावाचं वातावरण पसरलं आहे. दुर्गा पूजेच्या मंडपात कुराण ठेवल्याची अफवा कुणीतरी पसरवली होती. त्यानंतर काही समाजकंटकांनी हल्ला केला. यानंतर दोन गटात हाणामारी झाल्याने तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली.

“बांगलादेशात धार्मिक कार्यक्रमांवर हल्ला झाल्याच्या अहवाल आमच्याकडे आला आहे. बांगलादेश सरकार यावर कठोर कारवाई करत आहे. बांगलादेशात दुर्गा पूजा उत्सव साजरा केला जातो. आमचे अधिकारी सरकारच्या संपर्कात आहेत.”, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

“बांगलादेशच्या कमिला जिल्हा, कॉक्स बाजार आणि नोआखली मंदिर आणि दुर्गा पूजा मंडपात तोडफोड करणं, सोशल मीडियावर पसरलेल्या अफवेतून होणं निराशाजनक आहे.”, असं ट्वीट शुभेंदु अधिकारी यांनी केलं आहे. तसेच याबाबतचं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहीलं आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून १० जणांना अटक केली आहे. तर २२ जिल्ह्यात लष्कर तैनात करण्यात आलं आहे.