राष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ आली असून विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीचा उमेदवार म्हणून योग्य व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांची उमेदवारी नाकारली आहे. त्यानंतर आता महात्मा गांधी यांचे नातू तसेच पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांनीदेखील विरोधी पक्षांचा हा प्रस्ताव नाकारला आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी माझ्यापेक्षा दुसरा एखादा सर्वसमहमती असलेला उमेदवार द्यावा, असे गोपाळकृष्ण गांधी म्हणाले आहेत.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी विरोधी पक्षाकडून गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावाचा विचार केला जात होता. मात्र गोपाळकृष्ण गांधी यांनी एक निवेदन जारी करत विरोधकांचा हा प्रस्ताव नाकारला आहे. देशभरातून ज्याला सर्वसहमती असेल अशाच व्यक्तीला उमेदवारी द्यावी, असे गांधी म्हणाले आहेत. “काही विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मला उमेदवारी देण्याचा विचार केला जातोय. मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. मात्र राष्ट्रपतीपदाचा उमेदवार राष्ट्रीय पातळीवर सर्वसहमती निर्माण करणार असावा. माझ्यापेक्षा दुसरा एखादा व्यक्ती हे प्रभावीपणे करु शकेल असे मला वाटते. त्यामुळे अशाच एखाद्या व्यक्तीला ती संधी द्यावी, अशी विनंती मी या नेत्यांना करतो,” असे गोपाळकृष्ण गांधी आपल्या निवेदनात म्हणाले आहेत.
हेही वाचा >> ‘१६ वर्षांपेक्षा जास्त वयाची मुस्लिम मुलगी तिच्या मर्जीने लग्न करु शकते’: पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायलयाचा निकाल
याआधी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून योग्य उमेदवाराचा शोध घेतला जात होता. त्यासाठी सर्वात अगोदर शरद पवार यांचे नाव सूचवण्यात आले होते. मात्र त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यानंतर फारुक अब्दुल्ला यांनीदेखील निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर गोलपाळकृष्ण गांधी यांच्याकडे उमेदवारीसाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र त्यांनीही आता नकार दिल्यामुळे विरोधकांकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी कोणता चेहरा असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हेही वाचा >> Agnipath Protest: ‘भारत बंद’मुळे दिल्लीत मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या कित्येक किमी लांब रांगा
कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम?
निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे वेळापत्रकानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ जून असणार आहे. १८ जुलै रोजी मतदान आणि २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, “आयोगाने मतदानाच्या दिवशी कोविड प्रोटोकॉल पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आमदारांच्या एकूण मतांचे मूल्य ५,४३,२३१ आहे, तर खासदारांच्या एकूण मतांचे मूल्य ५,४३,२०० आहे. दोन्ही मतदारांच्या मतांचे एकूण मूल्य १०,८६,४३१ आहे. खासदारांच्या एका मताचे मूल्य ७०० आहे. खासदारांना संसद भवनात मतदान करणे बंधनकारक असणार आहे. तर आमदाय त्यांच्या त्यांच्या राज्यात विधानभवनात मतदान करतील.
दरम्यान, राष्ट्रपती पदाची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे वेळेवर योग्य उमेदवाराची निवड करणे गरजेचे आहे. याच कारणामुळे मंगळवारी विरोधकांकडून बैठकीचे आयोजन केले जाऊ शकते. या बैठकीत सर्वसहमतीच्या नावावर चर्चा केली जाऊ शकते.