भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊतांवर निशाणा साधलाय. शिवसेनेनं वाय दर्जाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन आज केंद्र सरकारवर निशाणा साधल्यानंतर पडळकर यांनी शिवसेनेला उत्तर दिलंय. यावेळी पडळकर यांनी राऊत यांचा उल्लेक ‘जनाब’ असा करत त्यांच्यावर निशाणा साधताना पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांची आठवण करुन दिलीय. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदर्भ देत पडळकर यांनी शिवसेनेला लक्ष्य केलंय.

“जनाब संजय राऊत उत्तरप्रेदश व गोवा निवडणुकीत तुमच्या पक्षाला नोटा पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. आदित्य ठाकरे यांना देशपातळीवर लाँच करून त्यांचा पुरता फज्जा उडवण्यामध्ये तुम्ही यशस्वी झाला आहात. कदाचित ज्यापद्धतीने काकांनी राहुल गांधींना एक टोपणनाव मिळवून दिले. तशीच तुमची काही सुप्त इच्छा आदित्य ठाकरे यांच्याबाबतीमध्ये दिसतेय,” असा टोला पडळकर यांनी लगावला आहे.

शिवसेनेनं उत्तर प्रदेशमध्ये घेतलेल्या प्रचारसभांमध्ये आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. गोव्यामध्येही शिवसेनेनं विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार दिलेले. मात्र दोन्ही राज्यांमध्ये शिवसेनेला एकही विजय मिळवता आलेला नाही. अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांचं डिपॉझिटही जप्त झालं. त्यावरुन पडळकरांनी हा टोला लगावलाय.

सरसकट होलसेलमध्ये ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरविण्याची वेळ मोदी सरकारवर आल्याची टीका करणाऱ्या शिवसेनेवर पडळकर यांनी टीका केली. “जनाब राऊत तुमच्या माहितीसाठी जेव्हा लाल चौकात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी कोई मा का लाल तिरंगा लहराके दिखाये अशा पद्धतीची धमक्या देणारी पोस्टर लावली होती. त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धमक्यांना भीक न घालता, धमक्यांना न जुमानता लाल चौकामध्ये तिरंगा फडकवून दाखवला होता,” असं पडकळर म्हणालेत. २६ जानेवारी १९९२ रोजी मोदींनी मुरली मनोहर जोशी आणि इतर भाजपाच्या नेत्यासोबत लाल चौकामध्ये तिरंगा फडकवला होता. त्याच घटनेची आठवण पडळकरांनी करुन दिलीय.

नक्की वाचा >> “वहिनीसाहेबांचा आग्रह आहे तर…”; अमृता फडणवीसांनी दिलेल्या ‘त्या’ सल्ल्यावर संजय राऊतांचं उत्तर

“जनाब राऊत तुम्ही वाय सुरक्षेबाबत लेख लिहता पण माझे तुम्हाला खुले आव्हान आहे. माझ्यासारखं महाराष्ट्रामध्ये सुरक्षेच्याविना फिरा म्हणजे शेतकऱ्यांचं तुमच्यावरती किती प्रेम आहे, याची तुम्हाला खरी प्रचिती येईल,” असा टोला पडळकर यांनी लगावला आहे. तसेच, “जनाब राऊत अजूनही उर्जामंत्र्यांच्या आश्वासनानंतर सुद्धा शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त तुम्ही करताय. यावर कधीतरी एखादा लेख लिहावा असं तुम्हाला वाटलं नाही,” असंही पडळकर म्हणाले आहेत.