केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कारला धडक देणाऱ्या कारचा चालक गुरविंदर सिंग याला मंगळवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. महानगरन्यायदंडाधिकारी पुनीत पाहवा यांच्यासमोर सिंग याला हजर करण्यात आले. या अपघातामागे घातपाताची शक्यता आहे का, याबाबत गुरविंदर याची गुप्तचर विभाग आणि विशेष गटाच्या वतीने चौकशी करण्यात आल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.  
गुरविंदरची चाचणी घेण्याची गरज आहे. यासाठी त्याला १४ दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती; परंतु यावर न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या व्यक्तीवर दाखल केलेला गुन्हा हा जामीनपात्र असून पोलिसांना गरज भासेल तेव्हा ते आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेऊ शकतात, असे स्पष्ट केले.
३० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सिंग याची सुटका करण्यात आली आह़े  अपघातप्रकरणी पुढील चौकशी चालू असून या प्रकारामागे घातपाताची शक्यता आहे का, हे पडताळून पाहण्यासाठी कोणताही मुद्दा मागे ठेवण्यात येणार नाही, असे दिल्ली पोलिसांनी न्यायालयासमोर सांगितले. अ‍ॅड. विकास पदोरा यांनी गुरविंदरच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली. सिंग याला १४ दिवसांची कोठडी देण्याच्या पोलिसांच्या मागणीला पदोरा यांनी विरोध दर्शवतानाच गुरविंदर याच्याविरोधात दाखल केलेला गुन्हा जामीनपात्र असल्याचे न्यायाधीशांसमोर मांडले.
भारतीय दंड विधानाच्या कलम २७९ अंतर्गत बेजबाबदारीने वाहन चालवणे, तसेच बेदरकारपणे वाहन चालवून एखाद्याच्या मृत्यूस कारण ठरणे, या गुन्ह्य़ाखाली पोलिसांनी गुरविंदरला अटक केली होती. गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीस दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते.
गुरविंदरने सिग्नल तोडला
गुरविंदर हा इंडिका कार चालवत होता. अरविंद चौकातून गोपीनाथ मुंडे यांची ‘मारुती-सुझुकी’ची एसएक्स-४ ही कार सफदरजंग रोडकडे निघाली होती. याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या तुघलक रोडकडे गुरविंदरची कार सिग्नल तोडून आली आणि तिने मुंडे यांच्या कारला आडवी धडक दिली. मुंडे ज्या सीटवर बसले होते. तिथेच कारने जोरदार धडक दिल्याने ते खाली कोसळले. यानंतर गुरविंदरला घटनास्थळावरूनच पोलिसांनी अटक केली.

मिस्ड कॉल आणि धाकधूक!
सकाळी साडेसहा- पावणेसात वाजेपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या तीनमूर्ती लेन या निवासस्थानावरील दूरध्वनी सारखा खणखणत होता. गडकरींचे स्वीय सहायक वैभव डांगे यांच्याही मोबाइलवर मिस्ड कॉल आले होते. गडकरींच्या कार्यालयात, ‘मुंडे यांना अपघात झाला असून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे’, असा संदेश देणारा फोन आला. फोन करणाऱ्याने नेमके नाव सांगितले नाही. त्यामुळे तातडीने डांगे यांनी संबधित नंबर फिरवला. तो नंबर होता पाशा पटेल यांचा. पुन्हा फोनाफोनी झाली. गडकरींच्या कार्यालयातून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना निरोप धाडण्यात आला, मात्र तत्पूर्वी हर्षवर्धन यांना अपघाताची माहिती मिळाली होती व ते एम्समध्ये दाखल झाले होते. पाठोपाठ गडकरी एम्समध्ये दाखल झाले, पण तोपर्यंत सारे संपले होते.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
Chandrakant Khaire
Chandrakant Khaire : “हात जोडून विनंती करतो, उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका”, चंद्रकांत खैरेंचं व्यासपीठावर कार्यकर्त्यांना दंडवत
Meter inspector suspended in bribery case
पिंपरी : लाच प्रकरणातील मीटर निरीक्षक निलंबित
Traffic rules Vietnam, Traffic rules reward ,
विश्लेषण : वाहतूक नियम मोडणारे दाखवा नि बक्षीस मिळवा… व्हिएतनाममधील अनोख्या उपायाची भारतातही नेटकऱ्यांमध्ये काय चर्चा?

अंतर्गत जखमा, हृदयक्रिया बंद पडल्याने मृत्यू
मुंडे यांचा मृत्यू हृदयक्रिया बंद पडल्याने तसेच शरीरांतर्गत जखमांमुळे झाला. त्यांच्या शरीरावर बाह्य़ जखमा आढळल्या नाहीत. मात्र त्यांचे यकृत २-३ ठिकाणी फाटलेले होते आणि या जखमांमुळे सुमारे दीड लिटर रक्त शरीरात पसरले होते, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन तसेच ‘एम्स’चे प्रवक्ते डॉ. अमित गुप्ता यांनी दिली. मुंडे यांच्या गाडीवर इंडिका कार आदळल्याने मुंडे यांना जोराचा धक्का बसला आणि त्यातूनच त्यांना हृदयविकाराचा झटका बसला, असे सूत्रांनी सांगितले. मुंडे यांना एम्स रुग्णालयाच्या ‘ट्रॉमा’ केंद्रात आणण्यात आले त्यावेळी त्यांची नाडी लागत नव्हती तसेच हृदयाची धडधडही सुरू नव्हती, असे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.
क्रूर काळाने डाव साधला!
सकाळी  ५.४५ : बीडमधील परळी या आपल्या गावी होत असलेल्या नागरी सत्काराकरिता गोपीनाथ मुंडे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक एस. नायर हे नवी दिल्लीतील लोढी इस्टेटमधील निवासस्थानावरून इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे येण्यास निघाले.
सकाळी ६.२० : त्यांची पीएलबी ८ सीबीएफ ००३४ ही एसएक्स४ गाडीगाडी पृथ्वीराज रोड-तुघलक रोड चौकातून वळण घेऊन सफदरजंग मार्गाकडे निघाली असतानाच अरविंदो मार्गावरून आलेल्या इंडिकाने त्यांच्या गाडीला धडक दिली.
* मुंडे गाडीत मागील बाजूस बसले होते, तर स्वीय सहाय्यक हे चालकाशेजारील सीटवर बसले होते. इंडिका गाडी नेमकी मुंडे बसले होते, त्या भागावरच जाऊन धडकली.
* या आघाताने मुंडे मागच्या सीटवरून खाली पडले. या अपघातात मुंडे यांच्या नाकाला जखम झाली. मात्र, ते शुद्धीवर होते. त्यांनी नायर यांच्याकडे पिण्यास पाणी मागितले व रुग्णालयात नेण्यास सांगितले.
सकाळी ६.३० : मुंडे यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) जयप्रकाश नारायण अ‍ॅपेक्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.
मात्र, त्यावेळी मुंडे बेशुद्धावस्थेत गेले होते. त्यांचा रक्तदाब, श्वासोच्छवास आणि नाडीचे ठोके बंद झाले होते. म्हणून पुढील १५ मिनिटे डॉक्टरांनी ‘सीपीआर’पद्धतीचा अवलंब करून त्यांचे हृदय सक्रिय करण्याचा प्रयत्न केला.
सकाळी ७.२० : डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले व महाराष्ट्राच्या झुंजार नेत्याची प्राणज्योत मालवली.

स्वतचा पोषाख, राहणीमानाच्या बाबतीत टापटीप असलेले गोपीनाथ मुंडे त्यांच्या आवडीचा पांढरा कुडता-पायजामा व त्यावर नेहरू जॅकेट घालून परळीला जायला निघाले. पायात चामडी चप्पल होती. त्यांच्या  गाडीत हिंदुस्तान टाइम्स , दैनिक जागरण व हिंदी हिंदुस्तान ही वर्तमानपत्रे होती. अपघातग्रस्त गाडीवर राज्यसभा सदस्य असे स्टीकर होते. अपघात झाला तेव्हा एक चप्पल व तीन वर्तमानपत्रे गाडीच्या मागच्या सीटवर विखुरलेली होती.

Story img Loader