केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कारला धडक देणाऱ्या कारचा चालक गुरविंदर सिंग याला मंगळवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. महानगरन्यायदंडाधिकारी पुनीत पाहवा यांच्यासमोर सिंग याला हजर करण्यात आले. या अपघातामागे घातपाताची शक्यता आहे का, याबाबत गुरविंदर याची गुप्तचर विभाग आणि विशेष गटाच्या वतीने चौकशी करण्यात आल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.
गुरविंदरची चाचणी घेण्याची गरज आहे. यासाठी त्याला १४ दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती; परंतु यावर न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या व्यक्तीवर दाखल केलेला गुन्हा हा जामीनपात्र असून पोलिसांना गरज भासेल तेव्हा ते आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेऊ शकतात, असे स्पष्ट केले.
३० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सिंग याची सुटका करण्यात आली आह़े अपघातप्रकरणी पुढील चौकशी चालू असून या प्रकारामागे घातपाताची शक्यता आहे का, हे पडताळून पाहण्यासाठी कोणताही मुद्दा मागे ठेवण्यात येणार नाही, असे दिल्ली पोलिसांनी न्यायालयासमोर सांगितले. अॅड. विकास पदोरा यांनी गुरविंदरच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली. सिंग याला १४ दिवसांची कोठडी देण्याच्या पोलिसांच्या मागणीला पदोरा यांनी विरोध दर्शवतानाच गुरविंदर याच्याविरोधात दाखल केलेला गुन्हा जामीनपात्र असल्याचे न्यायाधीशांसमोर मांडले.
भारतीय दंड विधानाच्या कलम २७९ अंतर्गत बेजबाबदारीने वाहन चालवणे, तसेच बेदरकारपणे वाहन चालवून एखाद्याच्या मृत्यूस कारण ठरणे, या गुन्ह्य़ाखाली पोलिसांनी गुरविंदरला अटक केली होती. गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीस दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते.
गुरविंदरने सिग्नल तोडला
गुरविंदर हा इंडिका कार चालवत होता. अरविंद चौकातून गोपीनाथ मुंडे यांची ‘मारुती-सुझुकी’ची एसएक्स-४ ही कार सफदरजंग रोडकडे निघाली होती. याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या तुघलक रोडकडे गुरविंदरची कार सिग्नल तोडून आली आणि तिने मुंडे यांच्या कारला आडवी धडक दिली. मुंडे ज्या सीटवर बसले होते. तिथेच कारने जोरदार धडक दिल्याने ते खाली कोसळले. यानंतर गुरविंदरला घटनास्थळावरूनच पोलिसांनी अटक केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा