केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे निधन हृदयक्रिया बंद पडल्याने तसेच  शरीरांतर्गत जखमांमुळे झाले, असे  ‘एम्स’चे प्रवक्ते डॉ. अमित गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे. मुंडे यांच्या शरीरावर बाह्य़ जखमा आढळल्या नाहीत. मात्र त्यांचे यकृत २-३ ठिकाणी फाटलेले होते आणि या जखमांमुळे सुमारे दीड लिटर रक्त शरीरात पसरले होते, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन तसेच ‘एम्स’चे प्रवक्ते डॉ. अमित गुप्ता यांनी दिली. मुंडे यांच्या गाडीवर इंडिका कार आदळल्याने मुंडे यांना जोराचा धक्का बसला आणि त्यातूनच त्यांना हृदयविकाराचा झटका बसला, असे सूत्रांनी सांगितले. मुंडे यांना एम्स रुग्णालयाच्या ‘ट्रॉमा’ केंद्रात आणण्यात आले. त्या वेळी त्यांची नाडी लागत नव्हती, तसेच हृदयाची धडधडही सुरू नव्हती, असे डॉ. गुप्ता यांनी स्पष्ट केले.