खासदारांच्या वेतनवाढीला विरोध दर्शवणाऱ्या भाजपा खासदार वरुण गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याने एकदा थेट पंतप्रधान कार्यालयातून फोन आल्याचा किस्सा मंगळवारी सांगितला. आमच्या अडचणीत का भर टाकताय ?, असा सवाल ‘पीएमओ’तून विचारण्यात आला होता, असे वरुण गांधींनी सांगितले.
भाजपा खासदार वरुण गांधी हे मंगळवारी उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरमधील महिला महाविद्यालयात एका कार्यक्रमासाठी गेले होते. या कार्यक्रमात त्यांनी हा किस्सा सांगितला. वरुण गांधी म्हणाले, मी सातत्याने खासदारांच्या पगारवाढीस विरोध दर्शवला आहे. प्रत्येक क्षेत्रातील कर्मचारी वर्गाला अथक मेहनतीनंतर पगारवाढ मिळते. मात्र, गेल्या १० वर्षांत खासदारांनी सभागृहात फक्त हात वर करुन सात पटीने पगार वाढवून घेतला. मी एकदा जाहीरपणे हा मुद्दा उपस्थित केला असता त्यावेळी मला पंतप्रधान कार्यालयातून फोन आल्याचे वरुण गांधींनी सांगितले. ‘आमच्या अडचणीत का भर टाकताय?’, असा प्रश्न मला पंतप्रधान कार्यालयातून विचारण्यात आला होता, असे त्यांनी नमूद केले.
उत्तर प्रदेशमधील शिक्षण पद्धतीवरही त्यांनी टीका केली. ‘उत्तर प्रदेशमधील शाळांमध्ये अभ्यास सोडून सारं काही होतं. लग्न सोहळे पार पडतात, नेत्यांच्या सभा होतात. इतकंच नव्हे तर मृत्यूनंतरच्या अंत्यविधीही पार पडतात. मुलं क्रिकेट खेळण्यात रमलेले असतात आणि नेतेमंडळी शाळेत भाषणं देतात’, असे त्यांनी सांगितले. ‘दरवर्षी शिक्षणावर ३ लाख कोटी रुपये खर्च केले जाते, असा दावा केला जातो.पण यातील ८९ टक्के निधी हा शाळेच्या इमारतींवर खर्च केला होता. याला शिक्षण म्हणतं नाही’, असे त्यांनी नमूद केले. सरकारकडून मदत मिळत नसल्याने शेतकरी सावकाराकडे जातो आणि कर्जबाजारी होतो. यामुळेच गेल्या १० वर्षांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचा दावा त्यांनी केला.
वरुण गांधींनी पाठवले होते लोकसा अध्यक्षांना पत्र
खासदारांच्या वेतनात वाढ करू नये अशी मागणी वरुण गांधी यांनी लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना पत्र लिहून केली होती. जानेवारीमध्ये त्यांनी ही मागणी केली होती. लोकसभेत सुमारे ४४० खासदार कोट्यधीश आहेत.आर्थिकदृष्टया सक्षम असणाऱ्या खासदारांनी आपले उर्वरित काळातील वेतन सोडावे, असे आवाहन त्यांनी खासदारांनाही केले होते. खासदारांचे वेतन व भत्ते ठरविण्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात यावा. संसदेत वेतन वाढविण्याचा अधिकार खासदारांना नसावा, असे मत त्यांनी गेल्या वर्षी व्यक्त केले होते.