देशातील अश्लील संकेतस्थळांवर (पॉर्न वेबसाईट्स) बंदी आणण्याचे महत्प्रयासाचे काम सरकारने हाती घेतल्यामुळे, आतापर्यंत बंदी घालण्यात आलेल्या गोष्टींच्या यादीत भर पडली आहे. पोर्न संकेतस्थळावर बंदी आणण्याआधी सरकारने देशात आणखी ज्या काही गोष्टींवर बंदी घातली आहे, त्याची माहिती पुढीलप्रमाणे :
गोमांस बंदी
महाराष्ट्र सरकारने यावर्षीच्या सुरुवातीला महाराष्ट्र पशुसंवर्धन (सुधारणा) विधेयक १९ वर्षांनंतर पुन्हा मांडले व त्याद्वारे बैल आणि गोवंश यांच्या हत्येवर बंदी घातली. त्यानुसार, कुणी गोमांस बाळगल्याचे आढळल्यास त्याला ५ वर्षांची कैद किंवा १० हजार रुपये दंड होऊ शकतो. ‘गोहत्येवर बंदी आणण्याचे आमचे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे’, असे ट्विट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्याबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आभार मानले होते.
मॅगी
फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया (एफएसएसएआय) या यंत्रणेने केलेल्या परीक्षणांच्या आधारे देशभरातील राज्य सरकारांनी नेस्ले इंडियाच्या ‘मॅगी’ या इन्स्टंट नूडल्सवर बंदी आणली. या उत्पादनात शिसे व मोनोसोडियम ग्लुटामेट यांचे प्रमाण मर्यादेपक्षा अधिक आढळले होते.
चित्रपट आणि वृत्तपट
दिल्लीतील ‘निर्भया’ बलात्कार व खून प्रकरणावर चित्रपट निर्माते लेस्ली उड्विन यांनी ‘इंडियाज डॉटर’ हा वृत्तपट तयार केला होता. बीबीसीकरता तयार केलेल्या या वृत्तपटात मुकेश सिंग या आरोपीची तिहार तुरुंगात मुलाखत घेण्यात आल्यामुळे हा वृत्तपट वादग्रस्त ठरल्यानंतर सरकारने त्याच्यावर बंदी घातली. अखेर बीबीसीने हा वृत्तपट भारतात प्रदर्शित न करण्यास मान्यता दिली. चित्रपट प्रमाणन मंडळाने मान्यता न दिल्यामुळे ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ शकला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा