लष्करातील गुप्तचर विभागाकडून कोणतेही अनुचित कृती होऊ नये, यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने शुक्रवारी दिली. 
जम्मू-काश्मीरमधील ओमर अब्दुल्ला यांचे सरकार अस्थिर करण्यासाठी लष्कराकडील गुप्त सेवा निधीचा गैरवापर केल्याचा ठपका लष्कराच्याच एका समितीने ठेवला आहे. लष्करातील उच्चस्तरिय अधिका-यांच्या बढतीमध्ये फेरफार करण्यासाठी आणि हवाई हल्लाभेदी उपकरणे खरेदी करण्यासाठीही या निधीची गैरवापर करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला. माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या तांत्रिक सेवा विभागाने या कामांसाठी निधीचा गैरवापर केल्याचे लेफ्टनंट जनरल विनोद भाटिया यांच्या चौकशी समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर केंद्र सरकारने शुक्रवारी त्याला दुजोरा दिला.
लष्कराच्या गुप्तचर विभागाकडून अब्दुल्लांचे सरकार अस्थिर करण्यासाठी निधीचा गैरवापर
लष्कराच्या मुख्यलयाकडून आपल्याला अहवाल मिळाला असल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. हा अहवाल देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित असल्याने काळजीपूर्वक त्यांचे परीक्षण केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे संरक्षण विभागाचे प्रवक्ते सितांशू कार यांनी सांगितले. या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करावी का, याबाबत संरक्षण मंत्रालयाने कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे कार यांनी सांगितले.