जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून होत असणाऱ्या हिंदू पंडितांच्या हत्यांच्या घटनांमुळे येथील स्थानिक हिंदू पंडितांच्या कुटुंबियांनी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांनी काश्मीरच्या खोऱ्यामधून पलायन करण्यास सुरुवात केलीय. गुरुवारी रात्रीच अनेक खासगी वाहनांमधून केंद्र सरकारच्या योजनांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबरच अनेक स्थानिक काश्मिरी पंडितांची कुटुंबं जम्मूच्या दिशेने रवाना झाली. आज पहाटे हे कर्मचारी आणि स्थानिक काश्मिरी पंडीत जम्मूमध्ये दाखल झाले. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हत्यासत्र सुरूच आहे. जिवाच्या भीतीने काश्मिरी पंडित व हिंदू नागरिक काश्मीर खोऱ्यातून बाहेर पडण्याची धडपड करत असून स्थानिक प्रशासनकडे सुरक्षा पुरवण्याच्या मागणीसाठी त्यांनी निदर्शनेही केली. तर काहींनी थेट पलायन केलं आहे.
कुलगाममध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी एका बँक व्यवस्थापकाची हत्या केली. दहशतवाद्यांनी १ मेपासून काश्मीरमध्ये केलेली ही आठवी हत्या असून, या हत्यासत्राचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. काश्मीर खोऱ्यातील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या बँक कर्मचाऱ्यांच्या हत्येनंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. अमरनाथ यात्रेआधी काश्मीरमधील हत्यांमुळे केंद्र सरकारची चिंता वाढली आहे.
काश्मीरचं खोरं सोडून जम्मूमध्ये दाखल होण्यासंदर्भातील निर्णयाबद्दल बोलताना काश्मीरच्या खोऱ्यातून पलायन केलेल्या अजय नावाच्या स्थानिकाने एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना काश्मीरमधील परिस्थिती फारच भयानक असल्याचं मत व्यक्त केलंय. “आजची काश्मीरमधील परिस्थिती ही १९९० पेक्षा भयानक आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आम्हा लोकांना आमच्याच कॉलीनीमध्ये का डांबून ठेवण्यात आलं आहे? प्रशासन आपलं अपयश का लपवण्याचा प्रयत्न करतंय?”, असा सवाल उपस्थित केलाय.
स्थानिकच नाही तर केंद्र सरकारच्या योजनांअंतर्गत काम करणाऱ्यांनीही काश्मीर खोऱ्यामधून पलायन केलं आहे. “येथील परिस्थिती अधिक वाईट झाली आहे. आजच या ठिकाणी चार हत्या झाल्यात. ३० ते ४० कुटुंबं शहर सोडून निघून गेलीय. आमच्या मागण्या पूर्ण करण्यात आला नाही. सरकारने उभारलेल्या सुरक्षा छावण्या या शहरामध्येच आहेत. श्रीनगरमध्ये कोणतीही जागा सुरक्षित नाही,” असं पंतप्रधान योजनेसाठी काम करणारा कर्मचारी अतुल कौल याने एएनआयशी बोलताना सांगितलं.
“इथे सुरक्षा कर्मचारीही सुरक्षित नाहीत तर सर्वसामान्यांना ते सुरक्षित आहेत असं कसं वाटणार? अजून काही कुटुंबं शहर सोडून जाणार आहे. काश्मिरी पंडितांसाठीच्या छावण्या पोलिसांनी सील केल्यात,” असं अशू नावाच्या व्यक्तीनं एएनआयशी बोलताना सांगितलं.
अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली…
दरम्यान, काश्मीरमधील याच हत्यासत्रांच्या पार्श्वभूमीवर नॉर्थ ब्लॉकमध्ये गृह मंत्रालयात सुमारे दीड तास केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, ‘रॉ’चे प्रमुख सामंत गोयल, ‘आयबी’चे प्रमुख अरिवद कुमार उपस्थित होते. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हेही शुक्रवारी दिल्लीत येत असून त्यांच्याशीही शाह चर्चा करणार आहेत. काश्मीर खोऱ्यातील हिंदूंच्या सुरक्षेसंदर्भात तातडीने पावले उचलण्यासाठी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जाते. शिवाय, जूनच्या अखेरीस अमरनाथ यात्रा सुरू होत आहे. दीड महिने चालणाऱ्या यात्रेत हजारो भाविक सहभागी होत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यादृष्टीनेही सिन्हा यांच्या चर्चेत आढावा घेतला जाणार आहे.
दहशतवाद्यांकडून बिगरमुस्लीम नागरिकांना लक्ष्य बनवले जात आहे
काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडित व हिंदू अल्पसंख्याकांच्या हत्येच्या घटना वाढत असून गेल्या तीन दिवसांमध्ये दहशतवाद्यांनी दोन जणांची निर्घृण हत्या केली. कुलगाममधील महापोरा भागातील इलाकाई देहाती बँकेचे व्यवस्थापक विजय कुमार यांची बँकेत घुसून हत्या करण्यात आली. विजय कुमार मूळचे राजस्थानातील आहेत. कुलगाममध्येच बुधवारी शालेय शिक्षिका रजनी बाला यांनाही गोळ्या घालून ठार मारण्यात आले. बाला या मूळच्या जम्मूतील सांबा जिल्ह्यातील रहिवासी होत्या. दहशतवाद्यांकडून बिगरमुस्लीम नागरिकांना लक्ष्य बनवले जात असून त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या हिंसाचारामुळे काश्मीर खोऱ्यामध्ये कायदा व सुव्यवस्था ढासळू लागल्याने अमित शाह यांनी गुरुवारी तातडीने सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांची बैठक घेतली.
१७ नोकरदारांच्या हत्या
दहशतवाद्यांनी यावर्षी पोलीस अधिकारी, शिक्षक, सरपंच अशा सरकारी सेवेतील १७ नोकरदारांच्या हत्या केल्या आहेत. फेब्रुवारीमध्ये श्रीनगरमधील प्रसिद्ध कृष्णा ढाबाच्या मालकांचा मुलगा आकाश मेहरा, ऑक्टोबर २०२१ मध्ये औषध दुकानदार एम. एल. बिंद्रू यांची हत्या करण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांमध्ये खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये खोऱ्यातील तरुणांचाही समावेश होता. हाही केंद्र सरकारसाठी चिंतेचा मुद्दा बनला असल्याचे सांगितले जाते.
काश्मिरातील सरकारी कर्मचाऱ्यांचा मोर्चा
काश्मीरमध्ये ठरवून करण्यात येत असलेले हत्यासत्र थांबत नसताना, खोऱ्यात नेमणूक करण्यात आलेल्या शेकडो सरकारी कर्मचाऱ्यांनी आपली गृहजिल्ह्यात बदली करावी, या मागणीसाठी गुरुवारी जम्मूत मोर्चा काढला. निदर्शकांच्या हाती त्यांच्या मागण्यांचे फलक आणि त्यांच्या सहकारी रजनी बाला यांची छायाचित्रे होती व ते आपली बदली करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या घोषणा देत होते. शिक्षिका असलेल्या रजनी बाला यांची दहशतवाद्यांनी मंगळवारी कुलगाम जिल्ह्यातील एका शाळेत गोळय़ा घालून हत्या केली होती.
कर्मचाऱ्यांचा मोर्चा प्रेस क्लब येथून आंबेडकर चौकापर्यंत निघाला. नेमकी व्यक्ती हेरून होणाऱ्या हत्या थांबवण्यात व आमच्यासाठी सुरक्षित वातावरण राखण्यात सरकार अपयशी ठरले असल्याने आपण कामावर परत जाणार नाही, असे ‘जम्मू येथील आरक्षित श्रेणीतील सर्व कर्मचाऱ्यांची संघटना’ अशा बॅनरखाली एकत्र आलेल्या आंदोलकांनी सांगितले.