देशातून भ्रष्टाचाराचे उच्चाटन व्हावे, यासाठी सरकार गंभीर नसल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे, असे मत संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी बुधवारी व्यक्त केले. मात्र सरकार भ्रष्टाचाराचा समूळ नाश करण्यासाठी कटिबद्ध असून ‘माहिती अधिकार’ हे त्याच दिशेने टाकलेले पाऊल आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
भ्रष्टाचाराविरोधात विश्वव्यापी मोहिम राबविणाऱ्या ‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ या नागरी संघटनेच्या भारतातील शाखेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, माहिती अधिकार कायद्याचा वापर आत्ता कुठे देशात सुरू झाला आहे. मात्र येत्या काही वर्षांत हा कायदा हे भ्रष्टाचाराविरोधातले महत्त्वाचे हत्यार ठरणार आहे. कोणत्याही संस्थेला आपली गैरकृत्ये लपवणे कठीण होईल आणि गोपनीयतेच्या भिंती ढासळून पडतील.
संरक्षण खात्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांबाबत ते म्हणाले की, संरक्षण खाते भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी आम्ही ठोस पावले उचलली आहेत. संरक्षणविषयक खरेदीतील भ्रष्टाचार संपुष्टात आणण्यासाठी दलाल आणि मध्यस्थांची साखळीच आम्ही नष्ट केली आहे. कारवार येथे नियुक्त झालेल्या एका नौदल अधिकाऱ्याच्या पत्नीने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. याप्रकरणी आपण तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत, असे अँटनी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा