मोबाईलधारकांची ‘कॉल ड्रॉप’च्या त्रासापासून लवकरच सुटका होणार आहे. त्यासाठी सरकारने युद्धपातळीवर मोहीम राबवली आहे. त्यानुसार, मुंबई, दिल्लीसह देशभरात आयव्हीआरएस प्रणालीचे (इंटीग्रेटेड व्हाईस रिस्पॉन्स सिस्टीम) उद्घाटन केले आहे. त्याद्वारे वापरकर्त्यांकडून कॉलच्या गुणवत्तेबाबत अभिप्राय मागवला जाईल. कॉल ड्रॉपची समस्या दूर करण्यासाठी वापरकर्त्यांनी दिलेला अभिप्राय दूरसंचार कंपन्यांना पाठवला जाईल. आयव्हीआरएस प्रणाली लवकरच संपूर्ण देशभरात कार्यान्वित करण्यात येईल.
सरकारी परिपत्रकानुसार, कॉल ड्रॉपची समस्या दूर करण्यासाठी दूरसंचार विभागाने देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांकडून अभिप्राय मागवण्याची योजना तयार केली आहे. त्यानुसार, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि गोवा या ठिकाणी २३ डिसेंबरला आयव्हीआरएस प्रणाली कार्यान्वित केली आहे.
मोबाईल वापरकर्त्यांना १९५५ या क्रमांकावरून कॉल करण्यात येईल. परिसरातील कॉल ड्रॉपसंबंधी समस्येवर प्रश्न विचारले जातील. कॉल ड्रॉपची समस्या सतावत असेल तर, त्याच क्रमांकावर आपल्या परिसरातील ठिकाणाचा मेसेज वापरकर्ते पाठवू शकतात. त्यानंतर ही समस्या मार्गी लावण्यासाठी संबंधित कंपन्या कार्यवाही करतील. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांकडून त्यांचा अभिप्राय मागवला जाईल. त्यानुसार, सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येतील. सुरुवातीला कॉल ड्रॉपवर अभिप्राय मागवण्यासाठी या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. त्यानंतर इतर सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी दिली.
कॉल ड्रॉपची समस्या सोडवण्यासाठी दूरसंचार विभागाने जून २०१६ ते ऑक्टोबर २०१६ दरम्यान एक लाख ३० हजार अतिरिक्त बीटीएस (बेस ट्रान्सीवर स्टेशन) लावले आहेत. याशिवाय मार्च २०१७ पर्यंत दीड लाख अतिरिक्त ‘बीटीएस’ उभारण्याचे नियोजन केले आहे. गेल्या महिन्यात दूरसंचार कंपन्यांच्या मालकांसोबत झालेल्या बैठकीनंतर कॉल ड्रॉपपासून मोबाईलधारकांची मुक्तता करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात येतील, असे दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले होते.