संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. सोमवारी केंद्र सरकारने लोकसभेत राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालाचा (NCRB) हवाला देत केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत एकूण १ लाख १२ हजार रोजंदारी करणाऱ्या मजूरांनी आत्महत्या केली आहे. तर याच काळात ६६,९१२ गृहिणी, ५३,६६१ स्वयंरोजगार करणारे लोक, ४३,४२० पगारी नोकरदार आणि ४३,३८५ बेरोजगारांनी आत्महत्या केलेल्या आहेत. याच अहवालाचा हवाला देताना केंद्रीय मंत्री यांनी विद्यार्थी आणि शेतकरी यांच्या आत्महत्येची आकडेवारी देखील लोकसभेत मांडली. २०१९ च्या नंतर भारतासहीत जगभरात कोरोनाचे सावट होते, त्या पार्श्वभूमीवर आत्महत्येचे हे आकडे नक्कीच धक्कादायक असे आहेत.
मागील तीन वर्षात देशभरात ३५,९५० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे, तर शेती क्षेत्राशी निगडीत असलेल्या ३१,८३९ शेतमजूरांनी आत्महत्या केली असल्याचेही केंद्रीय मंत्री म्हणाले. ही आकडेवारी २०१९, २०२० आणि २०२१ या तीन वर्षांमधली आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत भूपेंद्र यादव यांनी ही आकडेवारी मांडली.
केंद्रीय मंत्री यांनी ही माहिती देताना सांगितले की, असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम, २००८ च्या अनुसार सरकार असंघटीत क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी कटिबद्ध आहे. यामध्ये रोजंदारीवर काम करणारे मजूर देखील येतात. या कायद्यानुसार विम्याचे सरंक्षण, आरोग्याशी संबंधित कल्याणकारी योजना तयार करणे आणि मातृत्वाच्या काळात लाभ देणे, वृद्धावस्थेतील सुरक्षा आणि केंद्र सरकारच्या इतर अनेक योजनांचे लाभ देण्याची तरतूद आहे.
कामगारांसाठी कोणकोणत्या योजना
- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजना (PMSBY) च्या अंतर्गत विमा पुरविणे.
- PMJJBY ही योजना १८ ते ५० वर्ष वयाच्या सर्व लोकांना उपलब्ध आहे. मात्र त्यांच्याजवळ बँकेचे पासबुक किंवा पोस्टाचे खाते असणे आवश्यक आहे. बँकेत थेट पैसे वळते करण्यासाठी खात्याची परवानगी हवी.
- या योजनेतंर्गत विमा काढलेल्या व्यक्तीचा कोणत्याही कारणासाठी मृत्यू झाल्यास दोन लाखांची भरपाई मिळते. या योजनेसाठी ४३६ रुपयांचा वार्षिक प्रिमियम भरावा लागतो. जो विमा ग्राहकाच्या बँक खात्यातून आपोआप कापून घेतला जातो.
- ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत या योजनेत १४.८२ कोटी लाभार्थी जोडले गेले आहेत.