पीटीआय, नवी दिल्ली
भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारमध्ये सुनावण्यात आलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेविरोधात भारत सरकारने केलेले अपील कतारच्या न्यायालयात दाखल करून घेण्यात आले असे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाकडून याविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.कतारच्या न्यायालयाने गुरुवारी अपील दाखल करून घेतले असून पुढील सुनावणी लवकरच होईल असे माध्यमांच्या वृत्तांमध्ये नमूद करण्यात आले आहे. शिक्षेला आव्हान देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सरकारतर्फे गेल्या आठवडय़ात देण्यात आली होती. या अपिलाचा सकारात्मक परिणाम होईल अशी आशाही भारताकडून व्यक्त करण्यात आली आहे.
नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना कतारच्या न्यायालयाने २६ ऑक्टोबरला हेरगिरीच्या आरोपावरून मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. भारताकडून त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून अधिकाऱ्यांच्या बचावासाठी कायदेशीर उपाय केले जात आहेत.