समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव आणि केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल एका सरकारी कर्मचाऱयाला मंगळवारी अटक करण्यात आली.
संजय चौधरी असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्यावर माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार विशिष्ट जातीविरुद्ध हेतूपूर्वक प्रक्षोभक मजकूर प्रसिद्ध करून सामाजिक तेढ निर्माण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अभियंता असलेल्या चौधरी यांनी यादव आणि सिब्बल यांची आक्षेपार्ह कार्टून्स फेसबुकवर प्रसिद्ध केली होती. चौधरी हे एक स्वयंसेवी संस्था चालवितात. माझे फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आले असून, त्यावरून हा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे, असा दावा चौधरी यांना केला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये पालघरमधील दोन मुलींना अटक करण्यात आली होती. त्यावेळी अनेकांनी पोलिसांच्या कृतीचा निषेध केला होता.

Story img Loader