जम्मू-काश्मीर पोलिसांनी गुरुवारी एका दहशतवाद्याला घातक स्फोटकांसह अटक केली आहे. संबंधित दहशतवादी एका सरकारी शाळेचा शिक्षक असून मागील तीन वर्षांपासून तो एका दहशतवादी संघटनेसाठी काम करत आहे. आरिफ असं दहशतवाद्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून ‘परफ्यूम बॉटल बॉम्ब’ जप्त केला.
२१ जानेवारी रोजी जम्मूच्या नरवाल भागात दुहेरी बॉम्बस्फोटाची घटना घडली होती. या घटनेत नऊ जण जखमी झाले होते. या घटनेचा तपास करताना पोलिसांनी जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आरिफला अटक केली. गेल्या वर्षी मे महिन्यात वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या बसवर हल्ला करण्यात आपला सहभाग होता, अशी कबुली आरिफने दिली आहे. संबंधित हल्ल्यात चार यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा- लडाख जम्मू काश्मीरमध्ये असताना जास्त सुखात होतं; सोनम वांगचूक मोदी सरकारच्या धोरणांवर नाराज
याबाबतची अधिक माहिती देताना जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितलं की, आरिफ हा ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. त्याच्याकडून एक परफ्यूमची बॉटल जप्त केली आहे. या परफ्यूम बाटलीचे रुपांतर ‘इम्प्रोव्हायझ्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस’ (आयईडी) मध्ये करण्यात आले होते. जम्मू काश्मीरमध्ये अशा प्रकारचा बॉम्ब पहिल्यांदाच जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती दिलबाग सिंग यांनी दिली.
“आम्ही परफ्यूम आयईडी (आधुनिक स्फोटके) जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आम्ही यापूर्वी अशा प्रकारचा कोणताही परफ्यूम आयईडी जप्त केला नाही. या परफ्यूम बाटलीचा स्प्रे प्रेस करण्याचा किंवा उघडण्याचा प्रयत्न केल्यास या आयईडीचा स्फोट होतो. हे स्फोटक निकामी करण्याचं काम आमची विशेष टीम करत आहे,” अशी माहिती पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली.