विधान भवनात पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या आमदारांवर राज्य सरकारने कडक कारवाई करावी, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी मंगळवारी केली.
येथे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, की संबंधित आमदारांच्या गटावर कायद्यानुसार कारवाई केली गेली पाहिजे. अशी कारवाई झाली तरच त्यातून राज्यात कायद्याचे राज्य अस्तित्वात असल्याचा संदेश लोकांपर्यंत जाईल. विधिमंडळातील काही घटक या थराला गेल्याची मला लाज वाटते.  कायदा हातात घेतल्याने आमदारांची प्रतिष्ठा वाढत नसते. अशी कृत्ये करणाऱ्यांपासून आपण दूर आहोत हे इतर  आमदारांनीही स्पष्टपणे दाखवून दिले पाहिजे.
आमदारांवर कारवाईची टांगती तलवार!
पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना विधानभवनात मारहाण केल्याप्रकरणी दोषी आमदारांवर कठोर कारवाई करण्याचे विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केले आहे. तसेच कोणालाही पाठिशी घालणार नाही, सर्वावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. त्यानुसार क्षितीज ठाकूर, राम कदम, प्रदीप जयस्वाल, संजय कुटे, जयकुमार रावळ, राजन साळवी या आमदारांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एवढेच नव्हे, तर या आमदारांचे निलंबन वर्षभरासाठी केले जाईल, असेही बोलले जात आहे.