दिल्लीतील ‘महाराष्ट्र सदना’चे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांच्या मराठी द्वेषामुळे गणेशोत्सव अडचणीत आल्याच्या चर्चेने सोमवारी दिवसभर वातावरण तापले आणि दिल्लीकर मराठीजनांमध्येही असंतोष निर्माण झाला. मात्र महाराष्ट्र सदनात यावर्षीही गणेशोत्सव साजरा होईल व त्याचा खर्च शासनातर्फे केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपूर येथे दिली.
गणेशोत्सवाच्या मुद्यावरून दिल्लीत नेमके काय घडले, याची चौकशी केली जाईल, असेही चव्हाण यांनी रात्री पत्रकारांना सांगितले. मलिक यांच्या मराठीद्वेष्टय़ा वर्तनावरून याआधीही मुख्यमंत्र्यांकडे शिवसेनेने तक्रारी केल्या होत्या. त्यात सोमवारी गणेशोत्सवाचा वाद निर्माण झाला आणि या गणेशोत्सवातील ‘विघ्न’ राज्य सरकारने दूर करावे व हा उत्सव पार पाडावा, अशी मागणी भाजपने केली.  सेनाही उग्र पवित्रा घेणार, असे दिसताच मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
महाराष्ट्र सदनात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी येथील कर्मचारी सार्वजनिक गणेशोत्सव समिती स्थापन करतात. ही समिती राज्य सरकारकडे निधीसाठी प्रस्ताव पाठवते. यंदा मलिक यांच्या दहशतीमुळे ही समिती स्थापन झालेली नाही. त्यामुळे सरकारकडे सदनात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रस्तावदेखील पाठवण्यात आलेला नाही.
मराठी वातावरण, मराठी जेवण तर सोडाच साधा मराठी शिष्टाचारदेखील नसल्याने मराठी माणसाला महाराष्ट्र सदन कधीही आपले वाटत नाही. पण तरिही या सदनात अस्सल मराठमोळ्या वातावरणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात दिल्लीकर उत्साहाने सहभागी होतात. गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र सदनात गणेशोत्सव थाटात साजरा होतो. त्यासाठी सदनातील कर्मचारी-अधिकाऱ्यांची सार्वजनिक गणेशोत्सव समिती आहे. ही समिती राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून निधी देण्याची विनंती करते. मलिक यांचा अपवाद वगळता अन्य अधिकारी व मुख्यमंत्र्यांचा गणेशोत्सवासाठी सदैव पुढाकार असतो. विशेष म्हणजे एरव्ही आठ लाख रुपये देणाऱ्या राज्य सरकारने गेल्या वर्षी सदनातील गणेशोत्सवासाठी दहा लाख रुपयांचा निधी दिला होता.
परंतु गेल्या तीन वर्षांपासून निवासी आयुक्तपदावर ठाण मांडून बसलेले मलिक यांनी सातत्याने गणेशोत्सवाला विरोध केला. अर्थात त्यांनी कधीही उघड विरोध केला नाही. त्यांच्या छुप्या विरोधाला न जुमानता गेल्या वर्षी सदनातील वरिष्ठ अधिकारी नंदिनी आवाडे यांनी गणेशोत्सवाचे आयोजन केले होते. गणेशोत्सवास अवघे आठ दिवस उरले असताना आवाडे यांनी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवून वैविध्यपर्ण सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. यंदा मात्र आवाडे यांची महाराष्ट्रात बदली झाली आहे. गणेशोत्सवासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या नंदिनी आवाडे अध्यक्ष होत्या. परंतु त्यांची बदली झाल्याने अध्यक्षपद रिक्त झाले आहे. मलिक यांचा मराठी द्वेष व व्यक्तिगत आकस नको म्हणून सदनातील एकही कर्मचारी या समितीचे अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नाही.
त्यामुळे दिल्लीकर मराठी माणसाला सदनातील गणेशोत्सवाला मुकावे लागेल, अशी चिन्हे होती. मुख्यमंत्र्यांनी ही मदत जाहीर केली असली तरी समिती स्थापन होणे मात्र बाकी आहे. या घडामोडीत लक्ष घालण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याने महाराष्ट्र सदनावरील आडमुठी प्रशासकीय ‘विघ्ने’ही दूर होण्याची शक्यता बळावली आहे.

Story img Loader