‘घरवापसी’वरून वाद सुरू असतानाच सरकारने घाईने धर्मातर बंदी कायदा आणणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारसाठी हा प्राधान्याचा विषय नाही असे संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
त्याबाबत जर सहमती झाली व विरोधकांना जर धर्मातरबंदी कायद्याची गरज वाटत असेल तर विचार केला जाईल असे नायडू यांनी स्पष्ट केले. ‘घरवापसी’ कार्यक्रमांशी सरकारचा काही संबंध नाही याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मोदी सरकारच्या विकासाच्या कार्यक्रमावरून लक्ष वळवण्यासाठी काँग्रेसने हा मुद्दा उकरून काढल्याचा आरोप नायडूंनी केला. या मुद्दय़ावर साम्यवाद्यांशी संगनमत करून काँग्रेस चुकीचा प्रचार करत असल्याची टीका त्यांनी केली. ‘घरवापसी’ गेली शंभर वर्षे सुरू आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या शुद्धीकरण मोहिमेत अनेक काँग्रेस नेते आघाडीवर होते असा दावा नायडूंनी केला. धर्मातरावरून मी जेव्हा विधेयक आणण्याचे सुचवले तेव्हा काँग्रेस नेते अडचणीत आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.