योजनेची पूर्ती दशकभरात
विकास आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचा समतोल साधतानाच पुढील दशकभरात देशातील प्रत्येक शहरात नागरी वनीकरण मोहीम राबविण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करीत आहे. केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी येथे ही माहिती दिली.
शहरी भागांमध्ये वनीकरण मोहीम राबविण्यासंदर्भात कामही सुरू केले असून येत्या १० वर्षांत प्रत्येक शहरात वने उभारली जातील. पुणे शहरात तसे कामही सुरू केल्याचे जावडेकर यांनी सांगितले. आज शहरांमध्ये उद्याने आहेत पण वने नाहीत, याकडे लक्ष वेधून शहरी भागांमध्ये वनीकरण मोहीम राबविण्यासाठी आम्ही निधी देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. हरयाणातील पक्षी अभयारण्याच्या संकेतस्थळाचे उद्घाटन आणि एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात जावडेकर बोलत होते. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, हरयाणाचे राज्यपाल कॅप्टनसिंग सोळंकी हेही उपस्थित होते.
पर्यावरणाचे रक्षण करण्याबरोबरच विकासकामांना चालना आणि गरिबीचे उच्चाटन या कामांवर सरकारने लक्ष केंद्रित केले असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.
यासंबंधीचे विधेयक आगामी हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात येऊन त्यायोगे राज्यांना अधिक निधी उपलब्ध होईल, असे ते म्हणाले. जंगलांमध्येच प्राण्यांसाठी चारापाणी उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यामुळे प्राण्यांना जंगलांबाहेर जाण्याची वेळ येणार नाही आणि त्यामुळे माणसांबरोबर त्यांचा संघर्षही होणार नाही, असे जावडेकर यांनी नमूद केले.