भारतातील इस्लामिक धर्मगुरु झाकीर नाईक आपल्या वादग्रस्त विधानामुळे अडचणीत सापडले आहेत. बांगलादेशमध्ये दहशतवादी कृत्य करणारे दहशतवादी मला ओळखत असतील तर त्यात गैर काय असं वक्तव्य झाकीर यांनी केले होते. या दहशतवाद्यांना झाकीर यांच्याकड़ून प्रेरणा मिळाल्याची माहिती समोर आल्यानंतर झाकीर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. फेसबुकवर आपल्या अनेक फॉलोअर्स आहेत. त्यातील बहुतांश हे बांगलादेशी असल्याचे त्यांनी म्हटले असून हे दहशतवादी मला ओळखत असले, तरी त्यांच्या कृत्याला माझा पाठिंबा आहे असं होत नसल्याचा खुलासा झाकीर यांनी केला आहे. गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए)   झाकीरची सखोल चौकशी करत असल्याचे म्हटले आहे. झाकीर याच्या भाषणातून इसिस आणि आयएस या दहशतवाद्यांना प्राेत्साहन मिळते का? याबाबत सुरक्षा यंत्रणांकडून तपास केला जात आहे.
दरम्यान, झाकीर यांनी आपण ओसामा बिन लादेनबदद्ल दिलेल्या भाषणाच्या व्हिडिओत फेरफार करण्यात आल्याचा दावा केला आहे. कोणत्याही मुस्लिमाकडून दहशत पसरविण्याचा प्रकार घडता कामा नये. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. मुस्लिमांनी देशविरोधी घटकांविरोधात दहशतवादी व्हावे, असे मला म्हणायचे होते. मात्र, माझ्या भाषणाचा चुकीचा व्हिडिओ पसरविण्यात येत असल्याचा दावा नाईक यांनी केला.