केंद्र सरकारने ‘सेबी’च्या संचालक मंडळावर ज्येष्ठ वकील अरूण साठे यांची नियुक्ती केल्याने देशातील आर्थिक वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अरूण साठे हे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचे मोठे बंधू असून, ते काहीवर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही पूर्णवेळ कार्यकर्ते होते. १९८९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी वायव्य मुंबईतून सुनील दत्त यांच्या विरोधात भाजपकडून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये ते पराभूत झाले होते.
अरूण साठे यांची सेबीच्या संचालक मंडळावर अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. सेबीच्या संचालक मंडळावर पाच सदस्य नेमण्याचा केंद्र सरकारला अधिकार आहे. त्या अंतर्गत ही नियुक्ती करण्यात आली असल्याचे २८ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
देशातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या संस्थांवर राजकारणाशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती केली जात असल्यामुळे केंद्र सरकारवर आधीपासूनच टीका करण्यात येते आहे. पुण्यातील ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी केलेल्या नियुक्तीविरोधात तेथील विद्यार्थी दोन महिन्यांपासून संपावर आहेत. त्याचवेळी अनेक नामवंत कलाकारांनीही या नियुक्तीला विरोध केला आहे. त्यातच आता अरूण साठे यांच्या नियुक्तीमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बॅंक आणि सेबीतील अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. तिथे अद्याप नियुक्त्या करण्यात आलेल्या नाहीत. त्यातच सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांचाही कार्यकाळ येत्या काही महिन्यांमध्य संपुष्टात येणार आहे.
सुमित्रा महाजन यांच्या भावाची ‘सेबी’च्या संचालक मंडळावर नियुक्ती, अर्थक्षेत्रात आश्चर्य
केंद्र सरकारने 'सेबी'च्या संचालक मंडळावर अरूण साठे यांची नियुक्ती केल्याने आर्थिक वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
First published on: 14-08-2015 at 12:00 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govt appoints sathe on sebis board raises eyebrows