दिल्लीत ‘उबेर’ या खासगी कंपनीच्या टॅक्सीचालकाने एका तरुणीवर निर्जनस्थळी बलात्कार केल्यानंतर दिल्ली सरकारने ‘उबेर’ कंपनीच्या टॅक्सींवर बंदी घातली आहे. सोमवारी दुपारी हा निर्णय घेण्यात आला. बलात्कारप्रकरणातील आरोपी शिवकुमार यादव याला मथुरेतून अटक करण्यात आल्यानंतर त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. 
एक २७ वर्षीय पीडित तरुणी आपले कार्यालयीन काम उरकून शुक्रवारी सायंकाळी सात वाजता मित्रांसह भोजनासाठी बाहेर गेली होती. तिच्याच एका मित्राने तिला वसंतविहार परिसरापर्यंत सोडले. त्यानंतर आपल्या इंद्रलोक परिसरातील घरापर्यंत जाण्यासाठी तिने उबेर या खासगी कंपनीची टॅक्सी पकडली. मात्र प्रवासादरम्यान तिचा डोळा लागला. जेव्हा तिला जाग आली तेव्हा एका निर्जन परिसरात टॅक्सी आल्याचे आणि टॅक्सीचे सगळे दरवाजे बंद करण्यात आल्याचे तिच्या लक्षात आले. तिने मदतीसाठी आरडाओरडा केला असता टॅक्सीचालकाने खाली पाडले आणि आपल्यावर बलात्कार केला, अशी तक्रार तिने पोलीस ठाण्यात नोंदविल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
अमेरिकास्थित टॅक्सी कंपनी ‘उबेर’ला या प्रकरणाच्या तपासासाठी सहकार्य करण्याविषयी आदेश देणारी नोटीस दिल्ली पोलिसांनी याआधीच दिली आहे.

Story img Loader