संसदेचं पावसाळी अधिवेशन ११ ऑगस्ट रोजी संपलं. मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार, वाढती महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी पावसाळी अधिवेशन गाजवलं. याच मुद्द्यांवरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला होता. दरम्यान, आता सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. १८ ते २२ सप्टेंबरदरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटरवरून दिली आहे. ऐन गशेशोत्सवादरम्यान हे अधिवेशन बोलावल्यामुळे केंद्र सरकारवर टीका होऊ लागली आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाने यावरून केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी खासदार चतुर्वेदी म्हणाल्या, केंद्र सरकारने राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांना विशेष अधिवेशनासाठी बोलावल आहे. एकीकडे देशातला इतका मोठा सण साजरा केला जाणार आहे आणि त्याचवेळी या सरकारने हे अधिवेशन बोलावलं आहे. देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. खासकरून हिंदूंचा हा महाराष्ट्रातला हा खूप मोठा सण आहे.
खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, केंद्र सरकार हिंदूविरोधी काम करत आहे, हिंदूंच्या भावना दुखावण्याचं काम करत आहे. हे का केलं जातंय हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. नेमक्या कसल्या आधारावर त्यांनी हा निर्णय घेतला आहे? मुळात त्यांनी या अधिवेशनासाठी हीच तारीख का निवडली? केंद्र सरकार आणि संसदीय कामकाज मंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं. हेच का तुमचं हिंदुत्व? हिंदूंचा इतका मोठा सण, जो दिवाळीसारखा साजरा केला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यात, अगदी जगभरात साजरा केला जातो. नेमक्या त्याच उत्सवाच्या काळात तुम्ही हे अधिवेशन बोलावताय. नेमक्या कुठल्या आधारावर तुम्ही हे अधिवेशन बोलावलं आहे?
हे ही वाचा >> इंडियाचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? ओमर अब्दुल्ला यांनी मांडली स्पष्ट भूमिका, म्हणाले…
प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, केंद्र सरकारला गणेशोत्सवाच्या काळात हे अधिवेशन घेण्याची गरज का पडली? खरंतर हे सणासुदीचे दिवस आहेत, सुट्टीचे दिवस आहेत. नेमक्या त्याच वेळी यांनी हे अधिवेशन का बोलावलं आहे? बिहारच्या विधीमंडळात दिवाळीची सुट्टी कमी केली तेव्हा याच भाजपावाल्यांनी तिथे मोठा गोंधळ घातला होता. तेच भाजपावाले आता हिंदूविरोधी काम करत आहेत, हे दुर्दैवी आहे.