गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे स्पष्टीकरण; देशवासीय खंबीर
काश्मीर, बाबरी मशीद आणि गुजरात आणि मुझफ्फरनगरमधील जातीय दंगलींचा बदला घेतला जाईल, असा व्हिडीओ आयसिसने जारी केला असला तरी देशाच्या रक्षणासाठी आवश्यक असलेली सर्व पावले केंद्र सरकार उचलेल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.
देशातील सर्व जातीधर्माचे लोक सर्वशक्तिनिशी दहशतवादी शक्तींचा मुकाबला करतील, देश सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले सरकार उचलेल आणि त्याला देशवासीयांची साथ मिळेल, असा विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय बुद्ध पौर्णिमा दिवस कार्यक्रमाला हजर असलेल्या गृहमंत्र्यांनी वार्ताहरांशी बोलताना विश्वास व्यक्त केला.
अशा प्रकारचे धमकी देणारे व्हिडीओ येतच राहतील, मात्र त्यामुळे देशवासीय बिथरणार नाहीत, असे गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले. देशात अशा प्रकारच्या कारवायांना मूळ धरू द्यावयाचे नाही असा निर्धार देशवासीयांनी केला आहे, असेही ते म्हणाले. सध्या व्यक्ती, समाज आणि धर्मात संघर्षांचे वातावरण वाढत चालले आहे, मात्र बुद्धांच्या शिकवणीत या संघर्षांचे उत्तर सापडेल. प्रत्येकाने अहिंसेचा विचार केला तर अशा प्रकारच्या घटना वाढतीलच कशा, असा सवाल राजनाथ सिंह यांनी केला.

Story img Loader