राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीप्रकरणावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. या डील प्रकरणात खरेदी प्रक्रिया आणि अनेक समित्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला आहे. या डीलवर स्वाक्षऱ्या करण्यापूर्वी सरकाने मंत्रीमंडळाच्या समितीला विश्वासात घेतले नसल्याचेही चिदंबरम यांनी म्हटले आहे. तसेच यामागील कारण सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी त्यांनी केली.
काँग्रेसच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चिदंबरम म्हणाले, राफेल व्यवहारात संरक्षण उपकरणांच्या खरेदी प्रक्रियेकडे का दुर्लक्ष केले गेले. तसेच मुल्य माहिती समितीला अंधारात का ठेवण्यात आले? यासाठी मंत्रीमंडळाच्या समितीलाही विश्वासात घेण्यात आले नाही, असे सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केले.
चिंदबरम यांनी हा देखील दावा केला की, युपीए सरकारद्वारे निश्चित करण्यात आलेल्या प्रत्येक विमानाची किंमत आणि एनडीए सरकार ज्या किंमतीसाठी तयार झाले आहे, यामध्ये मोठी तफावत आहे. युपीए सरकारने प्रत्येक राफेल विमानाची किंमत ५२६ कोटी रुपये तर एनडीए सरकारच्या करारात एका विमानाची किंमत १६७० कोटी रुपये निश्चित केली आहे. जर ही आकडेवारी खरी असेल तर या किंमती तीन पटींनी कशा वाढल्या असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राफेल डीवरुन काँग्रेस आणि भाजपा यांच्यामध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरु आहे. काँग्रेसचा आरोप आहे की, डीलच्या दरम्यान भाजपाने राष्ट्रीय हिताकडे लक्ष दिले नाही. भाजपाच्या उद्योगपती मित्रांना फायदा व्हावा यासाठी हा वाढीव किंमतीचा करार करण्यात आल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.