फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) संचालक मंडळाच्या अध्यक्षपदावरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची सरकारने तयारी दर्शवली असून, विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये हजर राहावे आणि शैक्षणिक उपक्रमांना खोडा घालू नये, असे आवाहन केले आहे.
विद्यार्थ्यांनी जे काय प्रश्न असतील, त्यासाठी त्यांनी वर्ग बंद पाडणे हे त्यांच्या हिताचे नाही, असे मला वाटते. त्यांनी वर्ग सुरू राहू द्यायला हवेत. विद्यार्थ्यांच्या एखाद्या गटाने आमच्याशी चर्चा सुरू केली, तर त्यांचे स्वागतच आहे, असे माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड म्हणाले.
सरकारने अभिनेते गजेंद्र चौहान यांची संस्थेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी वर्गावर बहिष्कार घातला आहे. एफटीआयआयमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचे निराकरण करण्यास मंत्रालयाचे प्राधान्य असल्याचेही राठोड यांनी सांगितले.
आंदोलनकर्ते हे विद्यार्थी असून, एफटीआयआय ही संस्था प्रशासकीय, शैक्षणिक आणि सुविधांच्या दृष्टीने बळकट करणे हा आमचा उद्देश
आहे, असे प्रसार भारतीने भारतीय प्रसारण दिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या वेळी
राठोड यांनी पत्रकारांना
सांगितले. राज्यसभेतील खासदार तरुण विजय, प्रसार भारतीचे अध्यक्ष ए. सूर्यप्रकाश, मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सरकार यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला हजर होते.