वेतनातून भविष्य निर्वाह निधीची रक्कम कापण्यासाठी मूळ वेतन आणि अन्य भत्ते यांचे एकत्रीकरण करण्यात यावे, असा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने(ईपीएफ ओ)चा प्रस्ताव केंद्र शासनाने फेटाळून लावला आह़े  पाच कोटी पीएफधारकांसाठी हा झटका मानला जात आह़े  ईपीएफ ओकडून या संदर्भातील अधिसूचना लवकरच काढण्यात येण्याची शक्यता आह़े
मूळ वेतन आणि भत्ते यांचे एकत्रीकरण करू नये, असे स्पष्ट आदेश केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून ईपीएफ ओला एका पत्राद्वारे देण्यात आले आहेत़  त्यामुळे लवकरच या संदर्भातील अधिसूचना काढण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आह़े  
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ईपीएफ ओचा हा प्रस्ताव संमत झाला असता, तर ईपीएफ ओकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांतर्गत संघटित क्षेत्रातील कामगारांची बचत मोठय़ा प्रमाणात वाढली असती़  परंतु त्याच वेळी कर्मचाऱ्यांच्या निव्वळ वेतनात कपात होऊन त्यांच्यावरील आर्थिक बोजाही वाढला असता़  ३० नोव्हेंबर २०१२ रोजी ईपीएफ ओने काढलेल्या परिपत्रकानुसार, पीएफ कपातीसाठी मूळ वेतनाची सुधारित व्याख्या करण्यात आली होती़  त्यानुसार कर्मचाऱ्यांना मिळणारे सर्व प्रकारचे भत्ते हे पीएफ कपातीसाठी मूळ वेतन म्हणूनच ग्राह्य धरण्यात येणार होत़े

Story img Loader