पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेषत्वाने लक्ष असलेल्या गंगा नदीच्या शुद्धीकरण प्रकल्पासाठी केंद्र शासन आता २५ विशेष गटांची स्थापना करणार असून गंगा नदीचे प्रदूषण कोणत्या स्रोतातून मुख्यत्वे होते हे शोधून काढले जाणार आहे. त्यानुसार पुढील कृती ठरणार आहे.
जलस्रोत मंत्रालयांच्या विविध विभागांमधील लोकांचे गट स्थापन केले जाणार असून हे गट हिवाळी मोसमात गंगा नदीत कोणकोणत्या मार्गाने पाणी येते आणि उद्योगांचे सांडपाणी नेमके कोठून येते ते तपासले जाणार आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्याची शक्यता असून गंगा नदी वाहते त्या सर्व राज्यांमध्ये हे काम हाती घेतले जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
उदाहरणार्थ, कानपूर येथे हे विशेष गट जाऊन तेथील पाच किंवा सहा नाल्यांची तपासणी करून माहिती तपशीलवार मांडतील. त्याआधारे सांडपाणी पुनर्वापराचे प्रकल्प किती हाती घ्यावे लागतील याचीही माहिती गोळा केली जाणार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
उद्योगांकडून सोडले जाणारे पाणी किती आहे, कोणकोणत्या ठिकाणांहून हे पाणी गंगा नदीत सोडले जाते याची तपासणी केल्यानंतर भविष्यातील कृती आराखडा तयार करणे शक्य होणार आहे. गंगा नदीचे प्रदूषण कोणकोणत्या घटकांमुळे आणि नेमके कोणत्या स्रोतांमधून होते हे शोधल्यानंतर त्यावरची उपाययोजना करणे शक्य होणार आहे. हिमालयातील गंगोत्री येथून नदीचा उगम झाला असून भागीरथी हे गंगेचे मूळ नाव असून तेथून ही नदी बंगालच्या उपसागराला मिळेपर्यंत तब्बल २ हजार ५२५ किलोमीटरचा प्रवास करते. सांडपाणी, मैला आणि उद्योगांमधून सोडण्यात आलेले रसायनयुक्त पाणी यामुळे मुख्यत्वे गंगा नदी प्रदूषित झाली असून गंगा नदीच्या किनाऱ्यावर मध्यम आणि मोठी शहरे मोठय़ा प्रमाणावर वसलेली आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा