अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला परदेशातून पैसा मिळत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या असून  त्यांची चौकशी करण्यात येईल असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज सांगितले.
आम आदमी पक्षाला परदेशातून पैसा मिळत असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, अशा तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. आम्ही त्याची चौकशी सुरू केली आहे, कोणत्या देशातून त्यांना पैसा मिळतो, त्याचा नेमका स्रोत काय याची शहानिशा केली जाईल.
आम आदमी पक्षाला १९ कोटींची देणगी!
आम आदमी पक्षाला पैसा कुठून मिळतो याची चौकशी करण्यासाठी वेळ लागेल, दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या आधी म्हणजे ४ डिसेंबरच्या अगोदर त्याबाबत काही निष्कर्षांप्रत येता येणार नाही, असे ते म्हणाले. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे दिल्लीतील विधानसभा निवडणूक जोशात लढवित आहेत व भ्रष्टाचार विरोध हा एकमेव मुद्दा घेऊन ते उतरले आहेत. आम आदमी पक्षाला परदेशातून पैसा कुठून मिळतो याबाबत चौकशीचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी भ्रष्टाचारविरोध हा मुद्दा घेऊन निवडणूक लढणाऱ्या आम आदमी पक्षाला  पैसा कोठून मिळतो असा सवाल उपस्थित केला होता. आम आदमी पक्षाने श्रीमती दीक्षित यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर टीकेची झोड उठवली होती.
आम आदमी पक्षाने असे म्हटले आहे की, आम्हाला ८ नोव्हेंबपर्यंत अनिवासी भारतीयांसह ६३,००० व्यक्तींकडून १९ कोटी रुपयांचा निधी देणगीच्या रूपात मिळाला आहे. रिक्षावाले, व्यापारी व उद्योगपती यांनी आपल्याला १० रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत निधी दिला आहे, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन आणण्यासाठी या लोकांनी आम्हाला निधी दिला आहे.

Story img Loader