अनेक भारतीय प्रादेशिक चित्रपट लोकांना पाहायला मिळावेत तसेच जगभरात भारतीय प्रादेशिक चित्रपटांचा प्रसार व्हावा या उद्देशाने लवकरच सोशल मीडियाच्या माध्यमातून हे चित्रपट उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
संसदेच्या अंदाजपत्रक समितीने या संदर्भात माहिती व प्रसारण मंत्रालयाला विचारणा केली असून उत्तमोत्तम भारतीय प्रादेशिक चित्रपटांचा प्रसार करण्यासाठी फेसबुक, ट्विटर, यूटय़ूब अशा सोशल मीडियाचा वापर करण्याचे सुचविले आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या कामकाजासंदर्भातील अहवालावर संसदीय समितीमध्ये चर्चा करण्यात आली. जागतिक स्तरावर भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये निर्माण होणारे उत्तमोत्तम चित्रपट पोहोचावेत हा उद्देश आहे.
भारतीय भाषांमध्ये उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती होत असली तरी देशात तसेच जगभरातही हे चित्रपट पोहोचत नाहीत. म्हणून ही सूचना करण्यात आली असून याबाबत माहिती व प्रसार मंत्रालयाच्या सचिवांनी ही कल्पना उचलून धरली आहे, असेही या संसदीय समितीने नमूद केले आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून डाऊनलोडिंगद्वारे महसूलही गोळा होऊ शकेल, असाही विचार यामागे आहे.
अनेक दुर्मीळ आणि उत्तमोत्तम भारतीय भाषांमधील चित्रपट जतन न केल्यामुळे आजघडीला उपलब्ध नाहीत, याबाबत संसदीय समितीने निराशा व्यक्त केली. एवढेच नव्हे तर प्रत्येक भारतीय चित्रपटाचे जतन व्हावे यासाठी कायदेशीर तरतूद करून चित्रपट निर्माते-दिग्दर्शक आणि खासगी चित्रपट संग्राहकांना त्यांच्याजवळील चित्रपटाची एक प्रत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे जतन करण्यासाठी पाठविण्याचे बंधनकारक करावे, अशी सूचनाही संसदीय समितीने केली आहे.
‘आलम आरा’ हा पहिला भारतीय बोलपट आता उपलब्ध नाही असे समजते, असे सांगून या संसदीय समितीने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या कामकाजाचा व्यापक स्तरावर आढावा घेऊन सरकारने त्यासंबंधी संग्रहालयाची पुनर्रचना करावी, असेही नमूद केले आहे.
उत्कृष्ट भारतीय प्रादेशिक चित्रपट लवकरच एका क्लिकवर
अनेक भारतीय प्रादेशिक चित्रपट लोकांना पाहायला मिळावेत तसेच जगभरात भारतीय प्रादेशिक चित्रपटांचा प्रसार व्हावा या उद्देशाने लवकरच सोशल मीडियाच्या माध्यमातून हे चित्रपट उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
First published on: 10-02-2014 at 01:55 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govt to use social media to popularise regional cinema